माढा प्रतिनिधी तेज न्यूज
माढा विधानसभा मतदार संघासह भीमा नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये सध्या शेतीपंपांसाठी 8 तास वीजपुरवठा करण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आ. अभिजित पाटील यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
माढा विधानसभा मतदार संघासह भीमा नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये सध्या शेतीपंपांसाठी अत्यंत अपुरा वीजपुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी केवळ २ तास वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे विहिरी, बोअरवेल व नदीकाठावरील पाणीउपशावर पुर्णपणे शेती अवलंबून आहे. सध्या ऊस, डाळिंब, केळी, भाजीपाला तसेच इतर खरीप व बारमाही पिके उभी असून त्यांना वेळेवर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र केवळ २ तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिके वाळणे, जळणे त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.
तरी सदर परिस्थितीची गांभीयनि दखल घेऊन भीमा नदीकाठावरील सर्व गावांमध्ये शेतीपंपांसाठी किमान ८ तास नियमित व अखंडित बीजपुरवठा सुरू ठेवणेबाबत महावितरण व संबंधित विभागास आपले आदेश व्हावेत, अशी विनंती आ. अभिजित पाटील यांनी केली.


