फलटण प्रतिनिधी तेज न्यूज
गेल्या ३० वर्षांपासून विविध साहित्य क्षेत्रात जैनुद्दीन मुलाणी यांनी योगदान दिले आहे. विविध जिल्हा वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके, दिवाळी विशेषांक, व्यक्तिचित्रण, सामाजिक, राजकीय अशा विविध विषयावर जैनुद्दीन मुलाणी यांची साहित्य सेवा अखंडपणे चालू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जैनुद्दीन मुलाणी यांना धर्मवीर छत्रपती संभाजीराजे साहित्य सेवा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान बारामती च्या विज्ञान विभागाचे प्राध्यापक विजय काकडे यांच्या हस्ते हा पुरस्कार मुलाणी यांना देण्यात आला. यावेळी विशेष अतिथी म्हणून श्री शनैश्वर संस्थान, सोळशीचे मठाधिपती प. पू. तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज, मसाप फलटण शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. महादेव गुंजवटे, ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे, माझं कवितांचे गाव, जकातवाडीचे प्रल्हाद पार्टे, ग्रामीण कथाकथनकार प्रा. रवींद्र कोकरे, प्राचार्य रवींद्र येवले, प्रा. सुधीर इंगळे, प्रा. अमोल पवार, प्रा. शिवाजी वाघमारे, प्रा. राजेंद्र पाराध्ये यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले साहित्यिक, लेखक, कवी, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या तरुण संपादकांना नवी प्रेरणा मिळाली असून, फलटणसह राज्यभरातून जैनुद्दीन मुलाणी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


