संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या वाहतूक चिन्हे उद्यानाचे अनावरण प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या शुभहस्ते पार पडले. उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात निर्माण करण्यात आलेले वाहतूक चिन्हे उद्यान हे शिकाऊ लायसन्स व पक्के लायसन्स तसेच इतर कार्यालयीन कामकाजाकरिता आलेल्या नागरिकांना रस्ता सुरक्षेविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या उद्यानात रस्त्यावर असणारी बंधनकारक नियम,इशारा देणारे फलक,माहिती देणारी चिन्हे, रस्त्यावरील विविध प्रकारच्या खुणा,अत्यंत महत्त्वाचे रस्ता सुरक्षा नियम,सुरक्षितपणे वाहन चालविण्याविषयीच्या महत्त्वपूर्ण सूचना,अपघात समयी प्रथमोपचार पद्धत इत्यादी सर्व माहिती प्रतीकात्मक स्वरूपात या उद्यानात प्रदर्शित करण्यात आलेली आहे.या उद्यानाच्या आकर्षक प्रवेशद्वारामुळे या सर्व रस्ता सुरक्षा माहितीकडे कार्यालयात येणारे नागरिक आपोआप आकर्षित होतात.या उद्यानाच्या अनावरण प्रसंगी रस्ता सुरक्षा अभियानात आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सहभाग व सहकार्य केलेल्या शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज,श्रीराम शिक्षण संस्था पाणीव,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संस्था व नागरिकांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमप्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे, अश्विनकुमार पोंदकुले,मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके,मयूर भोसेकर,वैभव राऊत सर्व सहायक मोटार वाहन निरीक्षक,ड्रायव्हिंग स्कूल संचालक व प्रशिक्षक, चालक-मालक प्रतिनिधी संघाचे सर्व पदाधिकारी,नागरिक,वाहन चालक यांची उपस्थिती होती.
शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती होण्यासाठी अधिकाधिक शाळा महाविद्यालयांनी हे उद्यान आपल्या विद्यार्थ्यांना दाखवावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन झाडबुके यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे अक्षय साळुंखे व अर्चना दराडे यांनी केले.

