पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील उमा महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या डॉ. सुवर्णा हजारे डांगे लिखित ‘इतिहासाची ओळख : ऐतिहासिक साधने व संशोधन पद्धती’ या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
कुलगुरू दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, संशोधक व मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित करण्यासाठी अशा ग्रंथांची गरज अधोरेखित केली. विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी व पदव्युत्तर स्तरावर संशोधनाला दिलेले महत्त्व लक्षात घेता, सोप्या आणि नेमक्या भाषेत संशोधन पद्धती समजावून सांगणारे साहित्य अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी डॉ. सुवर्णा हजारे डांगे यांच्या कार्याचे कौतुक करून पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक साधनांचा अधिक सखोल अभ्यास करावा, नवीन संशोधन मांडावे आणि इतिहासातील दडलेली माहिती सर्वांसमोर आणावी, असे आवाहन केले.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांच्या समन्वयातून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना संशोधन पद्धतीची सुस्पष्ट समज आवश्यक आहे. ही गरज ओळखून बी.ए. भाग-२ च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने हा ग्रंथ तयार करण्यात आल्याचे लेखक डॉ. सुवर्णा हजारे डांगे यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश माने यांनी केले.
हा ग्रंथ इतिहास विषयातील विद्यार्थ्यांसाठी तसेच संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने मा आ. प्रशांतराव परिचारक, प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, एड. प्रणव परिचारक, प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. नारायणराव लोखंडे, डॉ. हनुमंतराव लोंढे, डॉ. एम. एस. पवार, सूर्यकांत पारखे, तानाजीराव वाघमोडे आदींनी अभिनंदन केले.

