पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
देगाव (ता.पंढरपूर) येथे देगाव ते बाभुळगाव जाणाऱ्या रोडवर यादव यांच्या वीट भट्टीजवळ करण्यात आलेल्या अवैध वाळूचा साठ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत 2 टिपर, एक जेसीबी व 8 ब्रास अवैध वाळू साठा दि. 14 रोजी जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे याना गोपनिय माहिती मिळाल्याने त्यांचे कार्यालयाकडील पोलीस पथकातील पोलीस अंमलदार हे देगाव येथे गेले. देगाव ते बाभुळगाव जाणारे रोडवर यादव यांच्या वीट भट्टीजवळ मोकळ्या जागेत वाळू साठा दिसून आला. वाळू जेसीबी मशीन च्या साह्याने दोन टिपर वाहनात भरत असल्याचे दिसून आले. तेव्हा टिप्पर आणि जेसीबी चालकास जागीच पकडण्यात आले.
जेसीबी चालक प्रवीण नानासाहेब बोराटे (वय 35) रा. मुंडेवाडी, ता. पंढरपूर तसेच टिपरचालक विश्वास हनुमंत चव्हाण (वय 43) रा. सुस्ते ता. पंढरपूर, तर मालक बालाजी मारुती पवार रा. देगाव असे असल्याचे सांगितले. तर टिपर मालकाचे नाव विचारले असता त्यांनी सदरचे टिपर हे सोमनाथ जाधव रा. देगाव यांचे मालकीची असल्याचे सांगितले. 2 टिप्पर प्रत्येकी 4 ब्रास वाळू भरल्याचे दिसून आले. त्यापैकी एक टिपर क्र. (डब्ल्यू बी 53 बी 1430) व दुसरा टिपर क्र.(एम.एच. 13 डिक्यू 2858) व बिगर क्रमांकाचा जेसीबी ताब्यात घेण्यात आला. यावेळी 8 ब्रास वाळू साठा मिळून आला. पो.उपनिरीक्षक भोसले यांनी ग्राम महसूल अधिकारी डी. बी. कोताळकर यांना बोलावून माहिती देऊन पुढील कारवाईकामी त्यांच्या ताब्यात वाळू साठयासह दिले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोहेकॉ रोकडे, खिलारे, रोंगे, पोना शिंदे, पोकॉ हुलजंती लोंढे यांनी पार पाडली आहे.
आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे चालु असल्यास आम्हास संपर्क करावा. यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकादेशीर कृत्य अथवा अवैध धंदे सुरू ठेवील, अशा समाजविघातक लोकांवर प्रचलित कायदयानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची यापुढे गय केली जाणार नाही, असा इशारा सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी दिला आहे.

