मोहोळ तालुका प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि सभापती निवडीचा कार्यक्रम आता संपला असून जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मोहोळ तालुक्यातून जिल्हा परिषदेवर माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांची निवड करावी अशी जोरदार मागणी जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि परिवाराकडून होत आहे.
भाजपाला चांगले यश मिळाले हे जसे नवीन कार्यकर्ते पालकमंत्री यांचे यश मानले जाते तसेच ज्यांनी आपल्या घरादाराची राख रांगोळी करुन वाताहत झाली तरी सुद्धा पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले अशा कार्यकर्त्यांनी केलेल्या पायाभरणीचे सुद्धा हे यश आहे याचा विसर पडू देता कामा नये अशी जोरदार चर्चा सुरू आहे. पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून मोहोळ तालुक्यात एकदाही भाजपचा सदस्य निवडूनआला नव्हता.
माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी ही परंपरा खंडित करत २००२ ते २००७ या काळात जनरल जागेवरून भाजप तर्फे निवडून येऊन भाजपाचा झेंडा मोहोळ पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा फडकावला होता. सन 1986 पासून पक्षात कार्यरत असलेले शंकराव वाघमारे यांनी पक्षाच्या विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामध्ये सन 1990 आणि 1992 ची श्रीराम जन्मभूमी कारसेवा असो, तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांची काश्मिरातील रथयात्रा असो मोठ्या हिरीरीने त्यांनी कार्यकर्त्यां सह सहभाग नोंदवला होता.
त्याचबरोबर सन 2008 आणि 2014 या वेळेस पदवीधर निवडणुकीचे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील यांना जिल्ह्यातून चांगली मते मिळाली होती आणि दोन्ही वेळेस ते विजयी झाले होते. तसेच 2009 मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक प्रभारी आणि 2014 मध्ये सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सहभागी करून चांगले काम केले होते. परिणामी अक्कलकोट येथे त्यावेळेस स्वर्गीय सिद्धाराम आप्पा पाटील आमदार म्हणून विजयी झाले होते.
तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून ॲड. शरद बनसोडे यांचा विजय झाला होता. पक्षाचे काम करत असताना त्यांच्यावर 1996 2004 या काळात चार वेळा जीव घेणे हल्ले झाले होते त्यामुळे त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता अशा सर्व प्रकारातून तावून सुलाखून निघालेल्या शंकरराव वाघमारे यांना यंदा पोखरापूर जिल्हा परिषद गटात उमेदवारी देणे अपेक्षित होते, मात्र तेथेही त्यांना डावलण्यात आले.
तथापि पक्षाच्या हितासाठी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम केले. त्यामुळे पंचायत समितीचे बहुमत मिळण्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या जास्त जागा निवडून येण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले ही गोष्ट सर्वांच्या समोर आहे. यामुळे शंकरराव वाघमारे यांच्या नावाचा प्राधान्याने विचार करावा अशी आग्रही मागणी मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यातील जुन्या नव्या अनेक कार्यकर्त्यां कडून होत आहे.

