मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
मोहोळ शहरातील एस.टी. स्टँडसमोरील पंढरपूर रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या आरक्षित जागेवर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा परवानगीशिवाय उभारण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गालगतच्या जागेवर अचानक पुतळा उभारला. सदर जागा हायवे प्रकल्पासाठी आरक्षित असल्याचे सांगण्यात येत असून, याबाबत कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली आहे की नाही, याची चौकशी प्रशासनाकडून सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागातील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सकाळपासून परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असून, “संभाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला असून, वाहतूकही काही प्रमाणात नियंत्रित करण्यात आली आहे.
या संदर्भात मोहोळचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले की, सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्कता बाळगण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यात आला आहे.

