नवी मुंबई प्रतिनिधी आशा रणखांबे तेज न्यूज
" डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या उद्देशिके नुसार भारतात समाजवाद ,लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्था निर्माण करून भारताचे सार्वभौमत्व, अखंड व एकात्म भारत ठेवण्यासाठी या देशातील प्रत्येकाला न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली.त्यामुळे सर्व भारतीयांची उन्नती झाली.विशेषत: महिला आणि अनुसूचित जाती जमातींना प्रतिष्ठेने जगण्याची , सन्मान प्राप्त करण्याची संधी मिळाली. " असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती डॉ .यशवंत चावरे यांनी केले . खारघर येथील व्हॅली गोल्फ कोर्स वर आयोजित संविधान जागरुकता व्याख्यान मालेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मराठी,हिंदी साहित्यिक, विचारवंत प्रा. दामोदर मोरे म्हणाले," भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फ्रेंच राज्यक्रांती पासून नव्हे तर बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून घेतली होती हे आपल्याला सप्रमाण सांगता येते.स्वातंत्र्य , समता , बंधुता , न्याय आणि धर्मनिरपेक्षता हे भारतीय लोकशाहीचे संविधानिक पंचशील आहे.लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व नागरिकांनी या पंचशीलाचे पालन केले तरच देशाची एकता आणि अखंडता कायम राहील."
प्रारंभी अजय फुलमाळी,जनार्दन लाखन तसेच सम्यक सामाजिक संस्थेचे डी.पी.कोपरकर आणि शरद कांबळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणे, संकेत साखरे, संदेश जाधव आणि राजेश नंदगवळी
यांनी प्रचंड मेहनत घेतली.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

