सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापराबाबत आचारसंहिता
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांत कार्यरत असलेले काही अधिकारी व कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्षांचा किंवा विशिष्ट उमेदवारांचा उघडपणे प्रचार करत असल्या बाबत तक्रारी येत आहेत. ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम, 1979 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे ठरत आहे. तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चे तरतुदींची उल्लंघन करणारे आहे. आचारसहहितेचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणारे मुख्य नियमानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियमानुसार, कोणताही सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय आंदोलनात किंवा राजकारणात भाग घेणार नाही. तसेच, कोणत्याही विधानमंडळाच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराचा प्रचार किंवा प्रभाव टाकणार नाही.
सोशल मीडियावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार प्रचार व पोस्ट करणे टाळावे. कर्मचारी आपल्या वैयक्तिक किंवा अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह, पोस्ट, व्हिडिओ किंवा उमेदवाराचे समर्थन करणारे स्टेटस ठेवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे टीका-टिप्पणी करु नये. शासन निर्णयांवर किंवा राजकीय नेत्यांवर सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह टीका करणे हे गैरवर्तणूक समजले जाते. तेव्हा सोशल मिडीयाच्या ग्रुप ॲडमिनची जबाबदारी महत्वाची ठरणार आहे. जर एखादा कर्मचारी व्हॉट्सॲप ग्रुपचा ॲडमिन असेल आणि त्या ग्रुपवर राजकीय प्रचार होत असेल, तर तो रोखणे किंवा तशा पोस्ट डिलीट करणे ही संबंधित कर्मचाऱ्याची जबाबदारी असणार आहे.
निमसरकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील आचारसंहितेचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार केवळ कायमस्वरूपी कर्मचारीच नव्हे, तर निमसरकारी, मानधनावरील कर्मचारी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही आपल्या सेवाशर्तीनुसार राजकीय प्रचारापासून दूर राहणे अनिवार्य आहे.
शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते.त्यानुसार विभागीय चौकशी सुरू करणे, सेवेतून निलंबन किंवा कायमस्वरूपी बडतर्फ करणे, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करणे अशी कारवाई होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आचासंहितेचे पालन करणे गरजेचे आहे.
प्रशासनाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सोशल मीडियाचा वापर केवळ कार्यालयीन कामे किंवा वैयक्तिक कारणांसाठी (राजकीय हेतू सोडून) करावा. कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रचार करताना आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यास जबाबदार धरून तात्काळ कारवाई करण्यात येईल.
-सचिन इथापे
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर

