स्वेरीत ‘ज्ञानसंवाद’ हा समारंभ संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
या स्पर्धेच्या युगात करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हार्ड वर्क’ करण्याची गरज आहे. ‘हार्ड वर्क’ केल्यामुळे कंपनी अथवा आपण जिथे नोकरी करतो तिथे आपली ओळख निर्माण होते. एकाग्रतेमुळे यश मिळण्याची शक्यता अधिक असते म्हणून पालकांनी निदान शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांप्रती भावनिक न होता त्यांच्या हिताच्या बाबी ओळखाव्यात व त्या बाबींना प्राधान्य द्यावे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मधील इंजिनिअरिंग व फार्मसी, लॉ, एमबीए, एमसीए, या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात तसेच थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग व फार्मसीला प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी आयोजिलेल्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने ‘ज्ञानसंवाद’ च्या माध्यमातून स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणुन अॅड. ज्ञानेश आराध्ये व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. माधुरी गवंडी हे उपस्थित होते. प्रारंभी डॉ.यशपाल खेडकर यांनी प्रास्ताविकात ‘स्वेरीची यशस्वी वाटचाल आणि त्याला लाभलेले डॉ.बी.पी.रोंगे सरांचे नियोजनबद्ध नेतृत्व' यावर सविस्तर माहिती दिली.
पुढे मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.रोंगे म्हणाले की, ‘आपण जर ठरवले तर आपण आपल्यात बदल घडवू शकतो. कठीण प्रसंगात संयम, परिस्थितीची जाणीव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण यशाला गवसणी घालू शकतो. सध्याचे युग हे संगणकाचे आहे. असे असतानाही आपण लेखनावर अधिक भर दिला पाहिजे कारण लिहीलेले अधिक लक्षात राहते. हेच स्वेरीचे वेगळेपण असून यावर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या करिअरची इमारत उभी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यास आनंदाने हुरळून जायचे नाही आणि अपयश आल्यास खचून जायचे नाही’ हे तंत्र बाळगले पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या पाल्याचे करिअर उज्वल करण्यासाठी मुळीच भावनिक होऊ नये. आपल्या पाल्यांना घडविण्यासाठी येथील उच्चशिक्षीत प्राध्यापक वर्ग सक्षम आहेत.’ असे सांगून ‘टीव्ही, मोबाईल व तथाकथित मित्र’ या तीन गोष्टींपासून स्वतःला दूर राहण्याचा कानमंत्रही प्राचार्य डॉ. रोंगे यांनी दिला.
याप्रसंगी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सौ. मोहितकर, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, स्वेरीचे सचिव डॉ.सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वैशाली अचकनळळी, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सचिन गवळी, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व विविध भागातून आलेले सुमारे दोन हजार विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

