अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी महामानव, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले हे होते. अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी बलभीम काळुळे, संजय राऊत, कल्पना मोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज पानसरे यांनी केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मरणार्थ साजरा होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाचे महत्व, सामाजिक समतेसाठी दिलेला लढा व या दिनामागील उद्देश सविस्तरपणे स्पष्ट केला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कृष्णा सरवदे यांनी आपल्या प्रभावी मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. “रक्ताचा एकही थेंब न सांडता जगातली सर्वात मोठी सामाजिक क्रांती घडवणारे आणि हजारो वर्षांची गुलामी अल्प काळात संपवणारे बाबासाहेब हे जगातील महान व्यक्तिमत्त्व असून त्यांचे कार्य अद्वितीय आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या मधुर आवाजात ‘जोडूनी दोन्ही कराला, करू वंदन भिमरायाला’ तसेच ‘दृष्टकाळाने भिमरायांची प्राणज्योत ती चोरली’ ही भावपूर्ण गीते सादर केली. याचबरोबर प्रा. दया पवार यांची ‘कोंडवाडा’ ही कविता सादर करून उपस्थितांच्या मनावर खोल ठसा उमटवला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अमोल फुले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका समाजाचे नेते नसून संपूर्ण मानवतेचे मार्गदर्शक असल्याचे सांगितले. “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा उन्नतीचा मूलमंत्र देणारे बाबासाहेब दलित समाजासाठी ऊर्जास्त्रोत होते. ते एका जाती-धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर ते विश्वरत्न व विश्वभूषण होते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नेटके नियोजन इयत्ता १० वी ‘ग’ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन कु. क्षेया भोसले हिने केले, तर अनुमोदन कु. दिव्या पिसाळ हिने मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी कु. अनुष्का हिने आभार मानले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, समता आणि न्यायाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

