सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापुरातील सोलापूर विव्हींग अँड स्पीनींग मील लिमिटेड म्हणजेच जुनी मिल ची सोलापुरात जुनी मील कंपाउंड,कंबर तलाव, उमा नगरी, धरमसी लाईन अशा विविध पाच ठिकाणी असलेली सुमारे १३७ एकर जागा मुंबई हायकोर्टाच्या लिलावामध्ये १९८९ साली सोलापुरातील अकराशे सभासदांनी कोर्टात पैसे भरून जुनी मिल बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती मार्फत खरेदी केलेली आहे. १९९६ ते ९८ दरम्यान वरील सर्व जागा कोर्ट रिसिव्हर कडून संस्थेच्या ताब्यात मोजणी करून हस्तांतरित करण्यात आलेली होती व त्या वेळचे तत्कालीन अध्यक्ष कुमार शंकर करजगी याने ही जागा ताब्यात घेतलेली होती. परंतु पुढे कुमार करजगी याने मूळ संस्थेचे नाव न लावता बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे बोगस कागदपत्रांद्वारे नगर भूमापन अधिकाऱ्यांच्या संगनमताने नोंद करून घेतली. परंतु सदर जागा ही जुन्या मिल ट्रस्टच्याच मालकीची असल्यामुळे धर्मादाय आयुक्त यांच्या परवानगीशिवाय कोणालाही विकता येत नाही.
या जागांवरील सर्व बांधकामे ही बोगस लेआउट व खरेदी खतांवर सोलापूर महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या बोगस बांधकाम परवानगी वर झालेली आहेत. यातील सर्व बांधकामांना आज पर्यंत वापर परवाने दिले गेलेले नाहीत. विशेष म्हणजे या जागेवर महानगरपालिकेने विविध १४ आरक्षणे टाकलेली आहेत व ही आरक्षणे उठवल्याशिवाय कोणालाही बांधकाम परवानगी देता येत नसताना सुद्धा येथे महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने असंख्य अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. या अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने कोणतेही शास्ती लावलेली नाही. अनेक बांधकामांचे लाखो रुपयांचा टॅक्स आज पर्यंत महानगरपालिकेने वसूल केलेला नाही. या सर्व गोष्टींवर कारवाई करण्यासाठी जुनी मील ट्रस्टचे सचिव डॉ. संदीप आडके यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त व सर्व संबंधित विभागांना वारंवार तक्रारी केल्या असताना सुद्धा सोलापूर महानगरपालिकेने याकडे सोयीस्कर डोळे झाक केलेली होती. परंतु दि. २७ /०६ २०२५ रोजी त्यांनी महानगरपालिकेस या सर्व अनधिकृत बांधकामावर व संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आठ दिवसाची अंतिम मुदत दिलेली आहे .यानंतर हे प्रकरण ते थेट सर्वोच्च न्यायालयात नेणार असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलेले आहे.
मनोहर सपाटे, विष्णुपंत कोठे, कुमार करजगी, आमदार देशमुखांचे चिरंजीव यांनी बोगस कागदपत्रांद्वारे संस्थेच्या जागा लाटून या जागांवर नागेश करजगी ऑर्किड स्कूल व ज्युनिअर कॉलेज ,शरदचंद्र पवार महाविद्यालय ,संभाजी शिंदे प्रशाला, राजेश कोठे इंग्लिश मीडियम स्कूल व लोकमंगल व्यापारी संकुले बांधलेली आहेत.
मनोहर सपाटे यांनी टी पी ४, फायनल प्लॉट नंबर १०६ येथील ७८६३ स्क्वेअर मीटर जागा यशवंत शिक्षण प्रसारक मंडळास दीर्घ मुदती करता नाममात्र भाड्याने देण्याचे २०/०७/१९९३ च्या सर्वसाधारण सभेत ठराव झालेला असताना चक्क कोर्टाची फसवणूक करून व एकही रुपयांचा मोबदला न देता महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून विकत घेतली आहे असे दाखवले आहे व या ठिकाणी अनधिकृत पणे शरदचंद्र पवार महाविद्यालय चालवत आहेत.
स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांनी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर याचे सचिव या नात्याने जागा कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असताना कुमार करजगी कडून ११४०० चौरस मीटर जागा फक्त ५१ रुपये मध्ये १९९७ साली खरेदी घेतलेली आहे. परंतु वास्तविक पाहता ही जागा ०८ मे १९९८ ला जुनी मिलट्रस्टला कोर्ट रिसीव्हरकरून मिळालेले आहे सध्या जुनी मिल कंपाऊंड येथे संभाजी शिंदे प्रशाला व राजेश कोठे इंग्लिश मीडियम स्कूल या शाळा चालतात.
कुमार शंकर करजगी याने स्वतःच्या सोनाशंकर ज्ञान विकास ट्रस्ट ला कोणताही मोबदला न घेता जुनी मिल ट्रस्ट ची जागा दिल्याची खोटे कागदपत्रे तयार केली आहेत व त्या ठिकाणी नागेश करजगी ऑर्किड स्कूल व ज्युनिअर कॉलेज चालवत आहे. जुनी मिलच्या जागेतील
वरील सर्व शैक्षणिक संस्था ,व्यापारी संकुले सर्व बांधकामे ही बोगस कागदपत्रांद्वारे सोलापूर महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून व वरील सर्वांनी खोटे प्रतिज्ञापत्राद्वारे झालेली आहेत.
१३७ एकर जागेतील अवैध बांधकामांवर कारवाई करायचे सोडून महानगरपालिकेने फक्त सोलापुरातील ९६ अनधिकृत बांधकामे व चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करून फार मोठी कामगिरी केल्याची शेखी मिरवत आहे. तीन दिवसांपूर्वी नगर रचना कार्यालयामध्ये उपसंचालक श्री मनीष बिश्नूरकर यांनी संबंधित जागेबाबत सुनावणी ठेवली असता कुमार करजगी हा जाणीवपूर्वक या सुनावणीस हजर राहिला नाही.पण पुढील आठ दिवसात जर ह्या विषयावर सो म पा ने बोगस बांधकामे व हे बोगस परवाना देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर हे प्रकरण थेट उच्च न्यायालय मध्ये घेऊन जाणार असल्याबाबतचा निर्वाणीचा इशारा जुनी मिल ट्रस्टचे सचिव डॉ. संदीप आडके यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त व बांधकाम विभाग प्रमुख मठपती यांना दिलेला आहे. त्यामुळे आता मनोहर सपाटे ,कोठे, कुमार करजगी व देशमुख यांच्यासह सोमपा तील आजी-माजी अधिकारी व कर्मचारी चांगलेच गोत्यात आलेले दिसत आहेत.