सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर बाल मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सिद्धेश्वर यात्रा अक्षता सोहळ्याच्या निमित्ताने 'लोकमत व्हिजन इव्हेंट प्रस्तुत' यात्रा मनामनात घराघरात या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांचा सात नंदीध्वज सोहळा 'एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय' या जयघोषात उत्साहात पार पडला.
सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मिरवणुकीची सुरुवात मुख्याध्यापिका सौ स्मिता कोरवार यांच्या हस्ते सात नंदीध्वज पूजन व पाच बालहिरेहब्बू यांच्या पादपूजनाने करण्यात आली. शाळेमध्ये अक्षता सोहळ्याची प्रचिती येण्यासाठी पालखी, बैलगाडी, नंदीध्वजधारक आदि देखावा सादर करण्यात आला होता. मुलांचा बाराबंदी पोशाख व मुलींनी इरकल साडी व परकर पोलका या वेशभूषेत हातात स्वतः तयार केलेले नंदीध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी 'श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय', एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र ' अशा जयघोषात ही लक्षवेधी मिरवणूक शिवपार्वती मंदिरापर्यंत काढण्यात आली.शाळेकडून मुलांना प्रसाद वाटण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सौ स्मिता कोरवार व पर्यवेक्षिका सौ सुनंदा कलशेट्टी तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ स्वाती गंभीरे व कु.अंकिता कलशेट्टी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल श्री सिद्धेश्वर शिक्षण संकुलाचे चेअरमन श्री धर्मराज काडादी तसेच शाळेचे पालक सदस्य श्री गुरुराज माळगे यांनी कौतुक केले.