पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यू ऍडीशन प्रोग्रॅम अंतर्गत सॉफ्ट स्किल्स आणि कॅम्पस ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश कारंडे यांनी दिली. सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच इतर कौशल्य आत्मसात करणेही तितकेच महत्वाचे झाले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच संभाषण कौशल्य, मुलाखत कौशल्य, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन, ताण तणावाचे व्यवस्थापन इ. कौशल्य आत्मसात करता यावीत यासाठी प्रथम वर्षापासूनच या ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कॉलेजचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
या साठी सी यु सक्सीड चे श्रीकांत सुंदरगिरी व त्यांच्या टीमचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यामध्ये सांघिक कार्य, आत्मविश्वास वाढविणे, भीती कमी करणे, ध्येय निश्चित करणे, शब्द संग्रह वाढविणे, सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे, व सादरीकरण अशा विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या ट्रेनिंगच्या उदघाटनाच्या वेळी सी यु सक्सीड चे श्रीकांत सुंदरगिरी व त्यांच्या टीमचे स्वागत प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वयन डॉ. दिपक गानमोटे तसेच आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले.