भाळवणी प्रतिनिधी
मुलांचा कल व आवड याचा विचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित ठेवले तर जीवनात नक्कीच यश मिळते. कठोर परिश्रमला पर्याय नाही. तसेच पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यामध्ये करियर करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे मत उपसरपंच नितीन शिंदे यानी केले.
भाळवणी (ता. पंढरपूर) येथील परफेक्ट कॉम्प्युटर क्लासेसच्या वतीने दहावी, बारावी व विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रणजीत जाधव हे होते.
यावेळी चांदणी निकम (कृषी सहाय्यक), आकाश कांबळे ( एअर पायलट), सचिन राऊत (एम.एस. एफ) यांची विविध पदावर नियुक्ती झाल्यामुळे तसेच दहावी, बारावी व विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शालेय साहित्य व आंब्याचे रोप देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्प्युटर सेंटरचे संचालक पवार यांनी केले.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील, माजी सरपंच राजीव पाटील, जयवंत कुंभार, धनश्री पवार, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा महाजन, हर्षदा माईंनकर यांनी केले तर आभार संजीवनी पवार यांनी मानले.