- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दाखवून उपस्थितांची जिंकली मने
- जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा घोष
सोलापूर प्रतिनिधी
सिंहगड संस्थेच्या वतीने पुणे येथे सिंहगड करंडक स्पर्धेत सोलापूरच्या केगाव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने 'फॅशन शो' या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले आहे.
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी प्रथमच सिंहगड संस्थेच्या वतीने पुणे येथे घेण्यात येणार्या 'सिंहगड करंडक' या अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून प्राथमिक फेरीतून सात पैकी सहा प्रकारामध्ये एका पेक्षा एक दर्जेदार कलाप्रकार सादर करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दरम्यान, अंतिम फेरीच्या स्पर्धेस मंगळवारपासून पुणे येथील वडगाव कॅम्पस सिंहगड येथे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 'फॅशन शो' हा कलाप्रकार सादर करण्यात आला. केगाव येथील सिंहगड महाविद्यालयाने हुबेहूब असा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करण्यात आला. येथील विद्यार्थ्यांनी हा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या कॅमेऱ्यात ही टिपला.
दरम्यान, फॅशन शो या प्रकारामध्ये मध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. सिंहगड संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले यांनी या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. यावेळी संस्थेचे सहसचिव व केगाव सोलापूर कॅम्पसचे डायरेक्टर संजय नवले उपस्थित होते.
या स्पर्धेत सिंहगड संस्थेच्या सर्व महाविद्यालयांमधून शिकत असलेले सर्व विद्यार्थी सहभाग घेत असतात. त्यामुळे चुरस असलेल्या या स्पर्धेत सोलापूर च्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात एवढे मोठे यश मिळवले आहे. फॅशन शो या स्पर्धेत एकूण 18 संघ अंतिम फेरीसाठी पात्र झाले होते. सोलापूर च्या विद्यार्थ्यानी 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक' या थीम वरती आपली कला सादर केली. अतिशय जोश पूर्ण वातावरणात व प्रचंड प्रतिसादात विद्यार्थ्यानी हे यश मिळविण्याचा आनंद व्यक्त केला.
या यशामुळे सिंहगड संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, इस्टेट ऑफिसर डॉ.दत्तात्रय नवले प्रा. शशिकांत हिप्परगी, सिंहगड पब्लिक स्कूल च्या प्राचार्य निखत शेख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.