सोलापूर प्रतिनिधी
दिनांक ११ ते १७ डिसेंबर दरम्यान रशियन इलीझारोव्ह सेंटर,आडके हॉस्पिटल ,सोलापूर व आसामी- इंडियन यांच्या संयुक्त विद्यमानाने इलीझारोव्ह फेलोशिप-२०२३ या कार्यशाळेचे आयोजन हॉटेल प्रथम येथे करण्यात आलेले आहे. त्याचे उद्घाटन रेव्हरंट विकास रणसिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. अस्थिरोगांवरील रशियन इलीझारोव्ह प्रशिक्षणासाठी पोलंड, दक्षिण सुदान, नेपाळ ,बांगलादेश व संपूर्ण भारतातून अस्थिरोग तज्ञांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावलेली आहे. इलीझारोव्ह तंत्रज्ञानात जगप्रसिद्ध असलेले सोलापूरचे अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप आडके हे स्वतः प्रशिक्षण देत आहेत.
रशियन इलीझारोव्ह ही जगातील अत्यंत प्रभावी व जवळपास ८० टक्के अस्थिरोगांवर लागू पडणारी ,अतिप्रगत ,उपचार पद्धती आहे. सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स, न जुळली किंवा वाकडी हाडे, लहान मुलांचे अस्थिरोग ,हाडांना लागलेले कीड ,पूर्वीच्या अयशस्वी शस्त्रक्रिया, गुडघेदुखी, हाता पायांचे अस्थीविकार, पोलिओ ,शरीराची उंची वाढवणे अशा अनेक असाध्य अस्थिरोगांवर विना चिरफाड ,नैसर्गिक पद्धतीने ,वाजवी खर्चात व खात्रीपूर्वक इलाज शक्य झालेले आहेत. या तंत्रज्ञानाची उपयुक्तता जगभर पसरवण्यासाठी रशियन इलीझारोव्ह सेंटर,आडके हॉस्पिटल तर्फे दरवर्षी अशा प्रशिक्षणाचे सोलापुरात आयोजन केले जाते.
आतापर्यंत डॉ. संदीप आडके यांनी असंख्य असाध्य अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया सोलापुरात यशस्वी करून दाखवल्या आहेत व जवळपास 3000 अस्थिरोग तज्ञांना याचे प्रशिक्षण दिले आहे त्यामुळे आज सोलापूरचे नाव या उपचार प्रणालीसाठी प्रसिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे आज सोलापुरात विमान सेवा सुरू नसताना देखील जगभरच्या डॉक्टरांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे ही सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रास अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.