भंडीशेगाव प्रतिनिधि
लप्पी हा विषाणुजन्य आणि संसर्गजन्य आजार असून गोचीड, गोमाशी, डास तसेच दूषित चारा व दूषित पाणी यामुळे हा आजार होत असून पहिल्यापेक्षा अति तीव्र स्वरूपाची दुसरी लाट असल्याने पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांनी केले.
श्रीनाथ विद्यालय, भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे पशुसंवर्धन विभाग व ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान, पंढरपूर यांच्यातर्फे आयोजित लम्पी जनजागृती अभियानांतर्गत या आजाराविषयीची माहिती आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉ. मोरे बोलत होते.
यावेळी डॉ.मोरे म्हणाले की ८० टक्के विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबांपर्यंत ही माहिती पोचावी, या उद्देशाने विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वजित माने, नामदेव आसबे,ऋषिकेश रसाळे ,पशुधन पर्यवेक्षक पंचायत समिती पंढरपूर डॉ. संजय देशपांडे, बी.डी.माने इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यपिका अनिता अंपळकर,भाजपा वैद्यकीय सेल चे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार,आदित्य येलमार,अशोक भालेराव,पंचायत समिती सदस्य पल्लवी येलमार आदी उपस्थित होते.