पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
महसूल विभागाकडून दि. 01 ऑगस्ट ते दि.07 ऑगष्ट या कालावधीत "महसूल सप्ताह" साजरा करण्यात येणार आहे. या विभागाच्या विविध योजना आणि सेवा याबाबत नागरिकांना माहिती प्राप्त होऊन त्यांना योजनांचा लाभ मिळावा. या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यात महसूल प्रशासनाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
राज्यभर 01 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने तालुक्यात 01 ते 07 ऑगस्ट या कालावधीत तालुक्यात प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात मंगळवार दि.01 ऑगस्ट रोजी नागरीकांच्या 7/12 उताऱ्यावरील भूविकास बँकाचे व बंडींग बोजे कमी करण्यात येणार आहेत. कलम 155नुसारü 7/12 उताऱ्यावरील दुरूस्ती करून उता-याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, महसूल सहाय्यक, शिपाई, कोतवाल व पोलीस पाटील यांच्या सन्मान करण्यात येणार आहे. 02 ऑगस्ट रोजी युवा संवाद कार्यक्रमातर्गंत गावोगावी उपक्रम राबवून लोकांना ऑनलाईन मतदार नोंदणी, पीकपाणी यांच्या नोंदी, तालुक्यातील विविध शाळेत विद्यार्थ्यांना दाखल्याचे वाटप होणार आहे. तसेच स्वेरी, अभियांत्रिकी महाविदयालय येथे नवीन मोजणी पद्धतीबाबत प्रशिक्षण व भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
दि.03 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा कार्यक्रमातर्गंत पीक विम्यासाठी लागणाऱ्या आवश्यक दाखल्यांचे वाटप, नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकांना अनुदान वाटप, आधारकार्ड अदययावतीकरण, जुन्या प्रलंबित वारस नोंदी व फेरफार नोंदीचा निर्गती, शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्याना धान्याचे वितरण, घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मोफत वाळू पुरवठा करण्याबाबत आयोजन करण्यात आले आहे. दि.04 ऑगस्ट रोजी जनसंवाद उपक्रमार्तंगत महसुल अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. दि.5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रमार्तंगत सैनिक व त्याच्या कुटुंबाला अवश्यक असणारे दाखले व प्रमाणपत्रे वितरण, माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
दिनांक 6 ऑगस्ट रोजी अधिकारी, कर्मचारी यांची प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्यात येतील तसेच अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणीसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 07 ऑगस्ट रोजी महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह निमित्त घेतलेल्या विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेण्यासाठी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी या सप्ताहामध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत योजनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केले आहे.