जिजाऊ युवती स्वसंरक्षण राज्यस्तरीय अभियानासह केटरिंग कॉलेजच्या पदवी पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ
सोलापूर. प्रतिनिधी
सोलापूरच्या पर्यटन तथा हॉटेल व्यवसायात मोलाची भर घालणाऱ्या केटरिंग कॉलेजच्या पदवी पदवीका शैक्षणिक वर्षाचा तसेच राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ राज्याचे पर्यटन तथा महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी 9 वाजता केटरिंग कॉलेज आवार, जुना विजापूर नाका धर्मवीर संभाजी तलाव शेजारी होणार आहे.
केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टे्ननॉलॉजी सोलापूर मध्ये सुरू करण्यात आली त्यामध्ये यंदाच्या वर्षीपासून पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून त्याचा शुभारंभ राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून संपूर्ण राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ सोलापूर मध्ये केटरिंग कॉलेजच्या कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आ.सुभाष देशमुख, आ.प्रणिती शिंदे, आ.रणजितसिंह मोहिते पाटील आदी मान्यवरांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. तसेच केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी या ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तसेच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या तीन मुर्ती प्रांगणात प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण सादर करण्यात येणार आहे. राज्यात एकाचवेळी 22 ठिकाणी या अभियानाचा शुभारंभ होणार आहे.

