पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातून उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी सुरज संभाजी खिलारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यु.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुरज खिलारे यांच्या यशामुळे स्वेरीने स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली आहे.
भक्कम पाया, योग्य मार्गदर्शन आणि अफाट परिश्रम या त्रिसूत्री च्या जोरावर सुरज खिलारे यांनी स्वेरीच्या इतिहासात आपली नोंद केली आहे. खिलारे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जयसिंगपुरच्या लक्ष्मीनारायण मालू या हायस्कूलमधून पूर्ण केले तर जयसिंगपुर कॉलेजमधून बारावी सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढे अभियांत्रिकीला कुठे प्रवेश घ्यायचा हा विचार करत असताना पंढरपूरच्या स्वेरीने त्यांचे लक्ष वेधले. २००९ साली स्वेरीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात प्रवेश मिळवला. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली व इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने कठोर परिश्रमाला सुरुवात केली.
चारही वर्ष वसतिगृहामध्ये राहून आणि अभ्यास करून त्यांनी खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेचा पाया रचला. स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांचे वैयक्तिक लक्ष, रात्र अभ्यासिकेतून झालेली सलग अभ्यासाची सवय याचा दुहेरी फायदा पुढे त्यांना स्पर्धा परीक्षेत झाला. पदवी मिळविल्यानंतर स्वेरीच्या कॅम्पस प्लेसमेंट विभागामार्फत जिंदाल स्टील कंपनीत ते रुजु झाले. काहीही झाले तरी ‘स्पर्धा परीक्षा द्यायचीच’ या ध्येयामुळे त्यांनी जॉब सोडला. एक वर्ष दिल्लीमध्ये अभ्यास केला आणि त्यानंतर घरी राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. सुरवातीला अपयश आले पण न खचता आणखी जिद्धीने आणि जोमाने अभ्यास करून तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आले.
यु.पी.एस.सी. मार्फत घेण्यात येणारी सीएपीएफ (एसी) असिस्टंट कमांडंट ही गॅझेटेड ऑफीसर ग्रुप ए दर्जाची सर्व्हिस आहे. केंद्रीय गृहमंत्रालया अंतर्गत ‘सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्स’ (सीएपीएफ) ही भारताच्या आंतरिक सुरक्षेची मोठी जबाबदारी पार पाडते. ‘स्वेरीतील नियमित अभ्यास, ग्रंथालयातील न्यूज पेपर्स यामुळे मला अभ्यासाला मदत झाली. स्वेरीमध्ये प्रवेश घेतल्यापासून ते स्पर्धा परीक्षा देईपर्यंत परिश्रमपूर्वक शिक्षण घेतले. स्वेरीतून केवळ शिक्षणच मिळते असे नाही तर बाहेरील विश्वात वावरताना आवश्यक असणारे संस्कारही स्वेरीतून मिळतात. 'बुक रीडिंग' या स्वेरीतील उपक्रमामुळे संदर्भ पुस्तके वाचायची आवड लागली. याचाही पुढे खूप फायदा झाला. ‘स्वेरीच्या वातावरणात प्रत्येक क्षण सत्कारणी लागतो. 'कुठेही आणि कोणताही क्षण वाया घालायचा नाही’ हे स्वेरीतून अर्थात डॉ. रोंगे सरांकडून शिकलो.
या सर्व प्रवासातून एक मात्र समजले की ‘कठोर परिश्रमाला कोणताही शॉर्ट कट नाही’ हाच विचार डॉ.रोंगे सरांनी आम्हा विद्यार्थ्यांच्या डोक्यात कायमचा बिंबवला आहे.’ अशी भावना स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या सुरज खिलारे यांनी व्यक्त केली. सुरज यांचे वडील संभाजी खिलारे हे कोल्हापूरमधील आदर्शगाव मधून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत तर त्यांच्या आई सौ. सुवर्णा खिलारे ह्या गृहिणी आहेत. सुरज यांना एक बहीण असून त्या ‘इन्फोसिस’ मध्ये नोकरी करत आहेत. यूपीएससी परीक्षेची निवड यादी नुकतीच जाहीर झाली असून ट्रेनिंग नंतर सुरज हे प्रशासकीय सेवेत रुजू होणार आहेत. यापूर्वी यूपीएससी या स्पर्धा परीक्षेत स्वेरीचे माजी विद्यार्थी संतोष माळी व सुनील आगवणे यांनी देखील यश मिळविले आहे.
संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सुरज खिलारे यांचे अभिनंदन केले आहे.