आधुनिक शेतीची कास धरल्यास विकास शक्य - जागतिक बँकेचे निवृत्त अधिकारी डॉ.अरविंद डागा
पंढरपूर प्रतिनिधी
‘शेती उत्पन्नात अधिक सुधारणा करायची असेल तर शेतीत आधुनिक यंत्राचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला पाहिजे. यातून शेतीसाठी लागणारी विविध अवजारे, ट्रॅक्टर, पेरणीयंत्र, रोटाव्हेटर, फण, पंजी, बीबीएफ यंत्र, नांगर अशा शेतीशी संबंधित यंत्रामुळे शेतीची कामे जलद गतीने व कमी खर्चात होतात. त्यातून शेतीच्या मशागतीची कामे हलकी होऊन शेतमजूरांवरील खर्च देखील वाचतो. इतकेच नव्हे तर शेतीसाठी घेतलेली महागडी यंत्रे ही इतर शेतकऱ्यांना भाडे तत्वावर देवून त्यातूनही उत्पन्न वाढू शकते. यातून शेतीला जोडधंदा देखील लाभतो म्हणून सध्या आधुनिक शेतीची कास धरल्यास शेतीचा पर्यायाने आपला विकास शक्य होणार आहे.’ असे प्रतिपादन जागतिक बँकेचे पश्चिम बंगाल मधील सेवानिवृत्त अधिकारी डॉ.अरविंद डागा यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला जागतिक बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ.अरविंद डागा यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. प्रारंभी सोबसचे गिरीश संपत यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना डॉ.डागा म्हणाले की, ‘भारत व भारतीय शेती यांबद्दल मला खूप आपुलकी असून भारतातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून कमी प्रमाणात शेती क्षेत्र असलेल्या भागात जास्तीत जास्त उत्पन्न कमी कालावधीत कसे निर्माण करता येईल यावर अधिक भर द्यावा. सध्या माझे कार्य देखील याच दिशेने सुरु आहे. सध्या आपल्याकडे नवनवीन यंत्रांची निर्मिती होत असून पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल? याबाबत त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. या भेटी दरम्यान त्यांनी स्वेरीमधील विविध उपक्रमांची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली.
स्वेरीची ग्रामीण भागातील गरुडझेप पाहून त्यांनी येथील विविध उपक्रमांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी पंढरपूरच्या लगत असलेल्या तावशी व खर्डी यासारख्या भागातील शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतीला भेट देऊन पाहणी केली. शेतीतील निघणारे उत्पादन हे जागतिक बाजारपेठेत लवकरात लवकर कसे पोहोचवता येईल आणि तेथून पुढे ते थेट ग्राहकापर्यंत कसे पोहोचेल, शेतातील मातीचे परीक्षण करून मातीचा दर्जा सुधारण्यासाठी कोण कोणत्या नवनवीन उपाययोजना कराव्या लागतील याबाबत त्यांनी ग्रामस्थांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी ‘सोबस इन्साईटस् फोरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी, स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डॉ. हर्षवर्धन रोंगे व इतर संशोधक प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते.