व्यावसायिक शिक्षणात प्रात्यक्षिक ज्ञान महत्वाचे -अनिल कदम
पंढरपूर प्रतिनिधी
‘पालक मेळाव्यातून पालक व शिक्षक यांचा महत्त्वपूर्ण संवाद होतो आणि त्या संवादातून पाल्यांच्या भविष्याची जडणघडण होत असते. स्वेरी ही शिक्षण संस्था आता राज्यात ब्रँड झाली आहे. डॉ.बी.पी. रोंगे सरांच्या कुशल नियोजनाखाली आणि शिस्तबद्ध वातावरणात आमच्या पाल्यांच्या भविष्याचा पाया हा मजबूत होत आहे. इंजिनिअरिंग असो अथवा फार्मसी, स्वेरीत आपला नंबर लागला तर आपले करिअर उत्तम घडते, असे आम्हा सर्व पालकांना वाटते. म्हणून पालक प्राधान्याने स्वेरीची निवड करतात आणि स्वेरीत नंबर लागला नाही तर पालकवर्ग इतर कॉलेजकडे वळतात, हा इतिहास सर्वश्रुत आहे. आमच्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासासाठी सतत पाठपुरावा, मुबलक सोई-सुविधा यामुळे आम्हा पालकांच्या पसंतीला उतरलेले हे स्वेरी कॉलेज आहे. म्हणून स्वेरी कॉलेजमध्ये एकदा विद्यार्थी रुजू झाला की आम्हा पालकांची चिंता मिटते कारण पाल्यांचे करिअर स्वेरीत सर्वोत्तम घडते. व्यावसायिक शिक्षणात प्रात्यक्षिक ज्ञान महत्वाचे असते. अशा परिस्थितीत आता पाल्यांनी देखील पुस्तकी ज्ञान मिळविण्याबरोबरच प्रात्यक्षिकांवर देखील अधिक भर द्यावा यामुळे व्यवहार ज्ञान आत्मसात होईल.’ असे प्रतिपादन पालक मेळाव्याचे प्रमुख पाहुणे अनिल कदम यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा फार्मसीमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थी व पालकांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालक मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल कदम मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसोबत पालक प्रतिनिधी कोंडीबा वांगडे व महिला पालक प्रतिनिधी सौ.संगीता माने हे देखील उपस्थित होते. प्रास्तविकात प्रा. शाहीस्ता शेख यांनी डी.फार्मसीची माहिती देताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध सोयी सुविधा, ‘कमवा आणि शिका’ योजना, सोलार रुफ टॉप पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, जिमखाना, एन.के.एन., अभ्यासक्रमाची व संदर्भ पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, वाहतुकीसाठी बस, १०२४ एम.बी.पी.एस. क्षमतेची वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम तसेच औषधांची निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी थेट इंडस्ट्रीयल व्हिजीट आदी फार्मसीच्या अभ्यासक्रमाशी निगडीत आवश्यक सुविधांची माहिती दिली. महिला पालक प्रतिनिधी सौ.संगीता माने म्हणाल्या की, ‘पालक आपल्या पाल्याच्या प्रगतीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून असतात. वेळप्रसंगी आपल्या पाल्यांच्या वर्गशिक्षकांस, विषय शिक्षकास वेळोवेळी संपर्क साधून पाल्याबाबत चौकशी करतात. यामुळे पाल्य अभ्यासाच्या बाबतीत जागरुक राहून अभ्यासाकडे अधिक लक्ष देतो व करिअर उज्वल करू पाहतो.
अशावेळी शिक्षकांनी पाल्यांच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान देखील मजबूत करावे कारण विद्यार्थ्यांनी भविष्यात केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय व उद्योग धंद्यामध्ये करिअर करण्याची गरज आहे.’ प्राचार्य प्रा. सतीश मांडवे म्हणाले की, ‘आपल्या पाल्यामध्ये अनपेक्षित बदल अथवा अभ्यासप्रती टाळाटाळ दिसून आली की पालकांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधून पाल्याच्या प्रगती विषयी माहिती घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबद्दल अथवा इतर शैक्षणिक शंका, अडचणी असल्यास त्यांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधावा.’ असेही आवाहन केले.
यावेळी सौ.अमृता पाटील, उल्हास लोखंडे, दत्तात्रय दोरगे, सौ.मनीषा चव्हाण, कोंडीबा वांगडे यांच्यासह काही पालकांनी उपस्थित केलेल्या सूचनांची नोंद करून घेण्यात आली.
काही प्रश्नांचे निराकरण त्वरित करण्यात आले तर काही प्रश्न वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सोडविले जातील.’ अशी प्राचार्य प्रा.मांडवे यांनी ग्वाही दिली. उत्तम मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करत असल्यामुळे तमाम पालकांच्या वतीने प्राचार्य प्रा.सतिश मांडवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील असे मिळून जवळपास १५० पालक, विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी सौ.प्रेरणा भोसले, विजय बोबडे, माऊली जाडकर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.कविता शिंदे यांनी केले तर प्रा. नितल दांडगे यांनी आभार मानले.