नवी मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. या भारत सरकारच्या खत उद्योगातून राजभाषा प्रबंधक या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या सौ. अस्मिता भावे यांचे हृदयविकाराच्या आजाराने ठाणे येथे, दिनांक ५.०४.२०२३ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आरसीएफ मधून २०१० मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सौ. अस्मिता भावे तत्पूर्वी त्या सचिवालयामध्ये अनुवादक म्हणून कार्यरत होत्या. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषदेचे काम केलेल्या सौ. भावे यांनी आरसीएफ मध्ये आल्यावर राजभाषेच (हिंदीच) रोपट त्यांनी लावलं आणि त्याचा विस्तारही जाणीवपूर्वक सर्वस्तरांवर करुन त्याचा वटवृक्ष केला. कंपनीच्या सर्व पत्रव्यवहारात राज भाषेचा अधिकाधिक उपयोग व्हावा या हेतूने त्या सतत कार्यरत राहिल्या. आरसीएफ मध्ये हिंदी वार्षिक अहवाल, गृह पत्रिका, दैनंदिन पत्र व्यवहार यात राजभाषेचा आवर्जून उल्लेख असावा म्हणून तो सर्व पत्रव्यवहार त्यांनी इंग्रजीतून हिंदीत भाषांतरित केला व संसदीय हिंदी कमिटी कडून त्यांच्या आरसीएफ च्या भेटीत कंपनीला नाव मिळवून दिले. कंपनीतील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी आपल्या दैनंदिन पत्र व्यवहारात हिंदीचा उपयोग केला तरी ते सरकार मान्य आहे असा विश्वास सर्वांच्या मनात त्यांनी जागवला. आणि रुजवलाही. व्यवस्थापन समिती, आरसीएफ संचालक मंडळ यांनी सौ. भावेंचा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कामाची वेळोवेळी दखल घेऊन त्यांचे खास अभिनंदन केले. कंपनीलाही विविध स्तरावर हिंदीची पारितोषिके प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा ठरला.
अनुवादामध्येही हातखंडा असलेल्या सौ. भावे यांनी काम करत असलेल्या विभागात आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना मिळकतीतून कशी गुंतवणूक करायची, हे त्या आवर्जून सांगायच्या. काम शिकवण्याची कलाही त्यांच्याकडे उत्तम होती.
कंपनीतील सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी समाजात विविध स्तरावर कार्यरत राहून महिला मंडळ, फिरते वाचनालय यासारख्या संकल्पना सोसायटीमध्ये राबविल्या.
अत्यंत स्वाभिमानी, सतत हसतमुख, प्रत्येकास मदतीचा हात देणाऱ्या व आपल्या विषयाची सखोल जाण असणाऱ्या तटस्थ व्यक्ती म्हणून सौ. अस्मिता भावे यांचे कौतुक सर्वांनीच वेळोवेळी केलं. असं एक गुणी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने आरसीएफ परिवारात दुःखाची छाया पसरली. आणि प्रत्येकाने आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या. भावपूर्ण श्रद्धांजली
सुभाष हांडे देशमुख
नेरुळ