यळकोट… यळकोट’ च्या गजरात मायणीत खंडोबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न
मायणी प्रतिनिधी
मायणी, ता. खटाव येथील इंदिरानगर येथे असलेल्या श्री खंडोबा देवाची यात्रा देवाच्या पालखीवर भंडार-खोबरे यांची उधळण करीत यळकोट… यळकोट जयमल्हार, सदानंदाचा यळकोटच्या जयघोषात उत्साहात पार पडली.
मायणी येथील आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक मित्रमंडळ अतिशय उत्साहाने ही खंडोबा देवाची यात्रा भरविते. श्री खंडोबा देवाची पालखीची मंदिरापासून गाव प्रदक्षिणा करत मिरवणूक काढण्यात खंडोबा देवाच्या पालखीची पूजाअर्चा करून, आरती करुन या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक भक्तांनी पालखीवरील भंडार-खोबऱ्याची उधळण केली.
संध्याकाळी पालखी मंदिराजवळ आल्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा घालून मंदिरासमोर पालखी नाचविण्यात आली. पारंपरिक पद्धतीने वाघ्या मुरळीचा भव्य जुगलबंदीचा कार्यक्रम झाला. देवाच्या जयघोषामध्ये देवाचा लंगीर तोडण्याचा( वाढवण्याचा) कार्यक्रम पार पडला. मोठ्या संख्येने भाविक भक्त यात्रेमध्ये सहभागी झाली.
यात्रा पार पडण्यासाठी आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक मित्र मंडळ मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले
या कार्यक्रमांमध्ये युवा पिढीने पुढाकार घेऊन सर्व कार्यक्रम निर्विघ्न केले.