पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सर्व सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन भरणेसाठी शुक्रवारी पंढरपूर पंचायत समिती येथे विशेष शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती कोषागार कार्यालयाकडून प्राप्त झाली असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी सांगितले.
सर्व शासकीय,अशासकीय सेवानिवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला अर्थात जीवन प्रमाणपत्र कोषागार कार्यालयाकडे द्यावे लागते. त्यामुळे सर्वसाधारणपणे सेवानिवृत्त व्यक्ती आपल्या बँकेच्या स्थानिक शाखेत जाऊन कोषागार कार्यालयाकडून आलेल्या यादीमध्ये आपली स्वाक्षरी करतात.
यावर्षीपासून शासनाने सर्व प्रकारच्या सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र भरणे आवश्यक केलेले आहे त्यासाठी *शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेमध्ये विशेष शिबिराचे आयोजन केले* आहे.
या शिबिरामध्ये जिल्हातील कोणत्याही तालुक्यातील सेवानिवृत्तीवेतन धारक असला तरी ऑनलाईन माहिती भरण्यात येईल.तालुक्याचे बंधन नाही.
त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सेवानिवृत्त वेतनधारकांनी ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याच्या शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्या इतर सहकाऱ्यांना या शिबिराबाबत माहिती द्यावी. तसेच प्रत्येक तालुक्यातील कोषागार कार्यालयात याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहेच.
तरी सर्व सेवानिवृत्ती वेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करावा असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयातील नितीन सुरवसे व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले आहे.

