पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
'मॅजिक बस इंडिया फाउंडेशन'च्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या 'कॉलेज समिट २०२६' मध्ये गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्रतिनिधित्व करताना संस्थेला 'व्हॅल्यूड पार्टनरशिप अवॉर्ड' आणि 'प्रशस्तिपत्रक' (सर्टिफिकेट ऑफ अप्रेशिएशन) देऊन सन्मानित करण्यात आले. वाणिज्य महाविद्यालय (एमएमसीसी) चे प्राचार्य किशोर निकम यांच्या हस्ते ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर यांनी संस्थेच्या वतीने हा सन्मान स्विकारला.
याच समिटमध्ये स्वेरीच्या एमसीए विभागाचे प्रमुख प्रा. मनसब शेख यांचाही विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी केलेल्या कार्याच्या अनुषंगाने त्यांचा गौरव करण्यात आला. याबरोबरच या कार्यक्रमात स्वेरीच्या उपप्राचार्या डॉ. श्रीमती मिनाक्षी पवार आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. अभिषेक एम. एस. यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यापूर्वी स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यंदाचा 'व्हॅल्यूड पार्टनरशिप अवॉर्ड' स्विकारल्यानंतर अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर यांनी सांगितले की, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नवीन तंत्रज्ञानामुळे आधुनिक कार्यक्षेत्राचे स्वरूप वेगाने बदलत आहे. या बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांशी (टेक कंपनीज्) मजबूत भागीदारी निर्माण करणे हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. या समिटमधून मिळालेल्या अनुभवाचा आणि विचारांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकास (स्किल डेव्हलपमेंट) घडवून आणण्यासाठी तसेच महाविद्यालयात प्रभावी कॅम्पस प्लेसमेंट उपक्रम राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असा विश्वासही प्रा. माढेकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना एमसीए विभागप्रमुख प्रा. मनसब शेख यांनी सांगितले की, ‘सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांच्यामध्ये उद्योगाभिमुख कौशल्ये, तांत्रिक क्षमता, समस्या निराकरणाची वृत्ती आणि रोजगारक्षमतेचा विकास करणे आवश्यक आहे. मॅजिक बस इंडिया फाउंडेशनसारख्या संस्थांसोबतचे सहकार्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वातील संधी आणि आवश्यक कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. या सन्मानामुळे स्वेरीच्या शैक्षणिक व कौशल्य विकासविषयक उपक्रमांना अधिक बळ मिळेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मॅजिक बस इंडिया फाउंडेशनसोबतची भागीदारी, विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि उद्योगाभिमुख शिक्षणासाठी स्वेरी करत असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यांची ही पावती मानली जात आहे. हा सन्मान म्हणजे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सामूहिक प्रयत्नांचा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचा आणि उद्योगविश्वाशी असलेल्या दृढ संबंधांचा गौरव आहे. स्वेरीला मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. मांडवे, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. बनकर, पदवी इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
चौकट: स्वेरीकडून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. चालू शैक्षणिक वर्षात आतापर्यंत २४ कंपन्यांनी कॅम्पस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांना २३ कंपन्यांकडून ६३८ ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत तसेच ३४९ विद्यार्थ्यांना स्टायपेंडसह इंटर्नशिप आणि ३५० विद्यार्थ्यांना संभाव्य प्री-प्लेसमेंट ऑफरची संधी उपलब्ध आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. सुमारे १२०० कंपन्यांशी प्लेसमेंटसाठी संपर्क साधण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण रोजगार क्षमतेसाठी एप्टीट्युड, इंग्रजी संभाषण, सॉफ्ट स्किल्स, मुलाखत तंत्र, कॅम्पस टू कॉर्पोरेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विभागनिहाय तांत्रिक प्रशिक्षण असे नियोजनबद्ध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

