कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज दि.२९ रोजी आयोजित केलेली सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली. त्यामुळे शशिकांत पाटील-चुयेकर यांची अधिकृत सभेतून अध्यक्षपदी निवड होऊ शकली नाही.
दरम्यान, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. ही निवड कायदेशीर असल्याचेही आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांनी म्हटले आहे.दरम्यान, सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना अध्यक्षपदाच्या निवडीच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
मात्र, नंदुरबार येथे बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना सहकार्य करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्ष करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते.
आजच्या सभेत आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने निवडणूक अधिकारी तथा करवीर विभागाच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली. समविचारी आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांनी आपल्याकडे बहुमत असल्याचे सांगत अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली होती.
यासंदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनही दिले. मात्र, कोरम पूर्ण नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय कायम ठेवला.यानंतर समविचारी आघाडीच्या संचालकांनी समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. नवनिर्वाचित संचालक अभिजित तायशेटे यांनी याबाबत माहिती दिली.
बहुमत असूनही कोरमअभावी निवडणूक अधिकाऱ्यांनी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे नेली नाही, त्यामुळे समांतर सभा घेऊन निवड केल्याचे त्यांनी सांगितले. ही निवड कायदेशीर असल्याचा दावाही तायशेटे यांनी केला. दरम्यान, समांतर सभेत झालेल्या निवडीला अधिकृत मान्यता मिळते का आणि गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा कसा सुटतो, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूरच्या राजकीय आणि सहकार वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण करणाऱ्या घडामोडींनंतर, शशिकांत पाटील- चुयेकर यांची 'गोकुळ' दुध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
शशिकांत पाटील-चुयेकर हे 'गोकुळ' दूध संघाचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव आहेत. तब्बल २५ ते ३५ वर्षांनंतर चुयेकर कुटुंबाकडे गोकुळच्या अध्यक्षपदाचा मान परत आला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीची सत्ता आल्यास शशिकांत चुयेकर यांना पहिले चेअरमन करण्याचे जाहीर केले होते. २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवून बहुमत सिद्ध केल्यानंतर त्यांनी हा शब्द पूर्ण केला.यापूर्वीही त्यांची अध्यक्ष होण्याची संधी थोडक्यात हुकली होती, ज्यामुळे संपूर्ण चुये गावात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.सर्व राजकीय चर्चा आणि तांत्रिक अडचणींवर मात करत संख्याबळाच्या जोरावर अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या निर्णयामुळे गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आणि चुये गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

