पुणे आपलाच बालेकिल्ला गमावून भाजप काय शिकणार? आता तरी 'टेबल पॉलिटिक्स' थांबवून कार्यकर्त्यांचा विचार होणार काय ?"पदवीधरांची अस्मिता, जाधव स्मिता..." चॅटजीपीटीवर जाऊन प्रचाराची घोषणा शोधण्यापर्यंत जेव्हा एखाद्या पक्षाची मजल जाते. तेव्हाच त्यांच्या पराभवाची चाहूल लागलेली असते.
पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणजे एकेकाळी प्रकाश जावडेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या दिग्गजांनी राखलेला भाजपचा अभेद्य बालेकिल्ला. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची लाट असतानाही जो गड शाबूत होता, तोच गड आज सलग दुसऱ्यांदा शरद पवारांच्या शिलेदारांनी काबीज केला आहे. दुसऱ्यांचे बालेकिल्ले फोडण्याच्या नादात आपलाच पारंपरिक गड गमावून बसलेली भाजप यातून काही धडा घेणार आहे की नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा विचार भाजप कधी करणार?पुणे पदवीधरमधील स्मिता जाधव यांचा पराभव हा केवळ एका उमेदवाराचा पराभव नाही, तर तो एसी केबिनमध्ये बसून खेळल्या गेलेल्या 'टेबल पॉलिटिक्स'चा दणदणीत पराभव आहे.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही एका दिवसाची नसते; त्यासाठी सलग दोन-तीन वर्षे गावोगावी फिरून पदवीधरांची मतदार नोंदणी करावी लागते. याच निवडणुकीच्या महत्त्वाकांक्षेपोटी शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तयारीही सुरू केली होती. मात्र, तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून अचानक 'वरिष्ठांची मर्जी' म्हणून स्मिता जाधव यांची उमेदवारी लादण्यात आली.
पक्षाने धक्कातंत्राचा वापर जरूर करावा, पण लोकांत न मिसळणाऱ्या चेहऱ्याला थेट मैदानात उतरवल्यावर जे व्हायचे तेच झाले. वर्षानुवर्षे घाम गाळणारा भाजपचा ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ता या प्रक्रियेपासून पूर्णपणे अलिप्त राहिला. 'वरिष्ठांनी लादलेला उमेदवार' ही जाधव यांची प्रतिमा शेवटपर्यंत पुसता आली नाही. आता तरी भाजपला शहाणपण सुचेल का? कार्यकर्त्याला गृहीत धरण्याची चूक पक्षश्रेष्ठी थांबवणार का?
भाजपला आणखी एक गोष्ट शिकण्याची गरज आहे, ती म्हणजे वास्तवाचे भान ठेवण्याची. एकीकडे पुण्यात नोकऱ्या नाहीत म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटलेले असताना आणि राज्यभरातील तरुण पदवीधरांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असताना, भाजपने या ज्वलंत प्रश्नांना हातच घातला नाही.
स्मिता जाधवांच्या पाठीशी डी. वाय. पाटील संस्थेचे मोठे आर्थिक बळ आणि 'पुढारी'सारख्या माध्यम समूहाची भक्कम ताकद नक्कीच होती, पण त्यांचा प्रचार एखाद्या उच्चभ्रू 'संस्थाचालका'सारखाच मर्यादित राहिला. आपण निवडणुकीत का आहोत आणि पदवीधरांसाठी काय करणार आहोत, याचा अजेंडाच त्यांना सेट करता आला नाही. याउलट, राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख यांनी सलग पाच जिल्ह्यांत पायपीट करत आपला थेट जनसंपर्क वाढवला आणि मतदारांना आपलेसे केले. कृत्रिम प्रचार आणि पैशांच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाहीत, हा धडा भाजपला आता तरी समजेल का? या सगळ्यावर कडी केली ती महायुतीतील अंतर्गत सुंदोपसुंदी आणि विसंवादाने. एरवी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी ऐन निवडणुकीत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे चित्र दिसले.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारा विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून बंडखोरी झाली. याचा थेट फटका पदवीधरला बसला आणि अजित पवार तसेच एकनाथ शिंदे गटाचे हक्काचे मतदान भाजपला मिळण्याऐवजी थेट शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख यांच्या पारड्यात जाऊन पडले. राजकारण किती स्वार्थी असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्हा! तिथे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे नेते जयकुमार गोरे व शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी जुळवून घेण्यास तयार नव्हते. हर्षदा देशमुख या माण-खटावमधून येतात आणि त्या विधान परिषदेवर गेल्या, तर भविष्यात विधानसभेला जयकुमार गोरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, या साध्या गणितापोटी गोरे विरोधकांनी देशमुखांना छुप्या पद्धतीने रसद पुरवली. कोल्हापुरात 'गोकुळ' दूध संघाच्या राजकारणामुळे महायुतीच्या विरोधात आधीच वातावरण तापले होते. तिथेही जाधवांना फटका बसला. एकूणच, भरकटलेली प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांचा रोष आणि मित्रपक्षांनी घातलेला अभूतपूर्व गोंधळ यामुळे भाजपचा या पारंपरिक बालेकिल्ल्यात दारुण पराभव झाला. एरवी एकमेकांचे उट्टे काढणाऱ्या महाविकास आघाडीने मात्र या निवडणुकीत एकीचे भक्कम दर्शन घडवत भाजपला अक्षरशः धूळ चारली.भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. आयात केलेल्या नेत्यांवर आणि लादलेल्या उमेदवारांवर विसंबून राहण्यापेक्षा, जो कार्यकर्ता पक्षाचा खरा कणा आहे, त्या कार्यकर्त्याचा सन्मान भाजप कधी करणार? बालेकिल्ले ढासळायला लागल्यावर तरी भाजप शहाणी होणार काय?
तुम्हाला काय वाटतं? भाजपला आलेली ही सत्तेची मस्ती आहे की चुकीच्या रणनितीचा फटका? पक्षाने कार्यकर्त्यांचा विचार न केल्यास आगामी काळात याचे आणखी मोठे पडसाद उमटतील का? सांगा

