पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटची दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपविरोधात राष्ट्रवादीच्या भैय्या माने यांनी बंडाचं अस्त्र उपसलं तर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र या दोन्ही उमेदवारांची बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आलं असून शेवटच्या दिवशी माने आणि चिवटे यांच्याकडून अर्ज मागे घेण्यात आला आहे. "हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव होता.
मात्र आमचे नेते हसन मुश्रीफ यांनी मला महायुतीची भूमिका समजावून सांगितली. त्यामुळे आज मी अर्ज मागे घेत आहे," अशी माहिती भैय्या माने यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे, मंगेश चिवटे यांचा प्रतिनिधीही अर्ज मागे घेण्यासाठी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचल्याने त्यांची माघारही निश्चित झाली आहे.दरम्यान, महायुतीतील प्रमुख बंडखोर उमेदवारांच्या माघारीमुळे आता पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे.
*भाजपसमोर निर्माण झालं होतं मोठं आव्हान.*
पदवीधर मतदारसंघात भैय्या माने आणि शिक्षक मतदारसंघात मंगेश चिवटे यांनी निवडणूक लढवली असती तर महायुतीतील मतविभाजनाचे गणित अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता होती. पदवीधर मतदारसंघात गुरुवारपर्यंत तब्बल ६८ उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव-देशमुख आणि भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यात प्रमुख लढत मानली जात असली, तरी भैय्या माने यांचा अर्ज कायम राहिला असता तर निवडणुकीची समीकरणे आणखी बदलली असती.
शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर, भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंगेश चिवटे हे प्रमुख उमेदवार रिंगणात होते. त्याचबरोबर माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि प्रा. सचिन सानप यांनीही दंड थोपटले होते. यातील मंगेश चिवटे यांच्या माघारीने भाजपच्या कौस्तुभ गावडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

