सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी संचालक पुन्हा बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश करणार का, याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार धरून तत्कालीन ३५ संचालकांसह अधिकाऱ्यांवर तब्बल २३८ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित माजी संचालकांना आगामी निवडणूक लढविता येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहार आणि नुकसानीच्या प्रकरणात तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. या रकमेतून वसुलीची प्रक्रिया सुरू असतानाच संबंधित प्रकरणाला सध्या स्थगिती असल्याने माजी संचालकांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आगामी जिल्हा बँक निवडणुकीत या माजी संचालकांना उमेदवारी करता येणार की नाही, तसेच त्यांच्यावर निश्चित झालेल्या जबाबदारीचा निवडणूक लढविण्यावर काय परिणाम होणार, याबाबत सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. स्थगिती कायम राहते की पुढील काळात कायदेशीर स्थितीत बदल होतो, यावर अनेक इच्छुकांचे राजकीय गणित अवलंबून राहणार आहे.
जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीत सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच माजी संचालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे २३८ कोटींच्या जबाबदारीचे प्रकरण आणि त्यावर असलेली स्थगिती यामुळे माजी संचालकांचा पुन्हा बँकेत प्रवेश होणार का? हा प्रश्न सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

