पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित बिल, शेतीपंपांचा वीजपुरवठा, बिबट्याचा बंदोबस्त, ऊसावरील पायरीला रोग, खते व कृषी औषधांच्या वाढत्या किमती तसेच विजेच्या दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबांना मदत यांसह विविध मागण्यांसाठी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावर ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात आले.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
‘पिके जळाली तर जबाबदारी कोणाची?’ — सचिन पाटील
आंदोलनाला संबोधित करताना शेतकरी नेते सचिन पाटील यांनी शेतीपंपांचा वीजपुरवठा बंद करण्याच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला.
“शेतीपंपाची लाईट बंद केल्यामुळे जर शेतकऱ्यांची पिके जळाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालक म्हणून शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी. शेतकऱ्यांसाठी पाणी आणि विजेचे नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे,” अशी टीका सचिन पाटील यांनी केली.
त्यांनी पुढे “शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. पिके वाचवण्यासाठी तातडीने शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करा,” अशी मागणी केली.
ऊसाच्या पोळ्याच्या बिलासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान, चंद्रकांत बागल नामक शेतकऱ्याने ऊसाच्या पोळ्याच्या बिलाच्या मागणीसाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळत नसल्याने निर्माण झालेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून शासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
तहसीलदारांनी अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावले दरम्यान, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोट, नायब तहसीलदार बालाजी पुदलावड आणि पन्हाळकर यांनी आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी महावितरण (MSEDCL), वन विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावून घेतले आणि आंदोलकांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली.
शेतीपंपांचा वीजपुरवठा, गादेगाव परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त, ऊसावरील पायरीला रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना आणि इतर मागण्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.
या आहेत प्रमुख मागण्या
- पोळा सणासाठी परंपरेप्रमाणे ऊस बिलाचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा.
- शेतीपंपांचा अचानक कपात केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा.
- वीजअभावी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.
- गादेगाव परिसरातील बिबट्याला तातडीने पकडून सुरक्षित अधिवासात सोडावे.
- ऊसावरील पायरीला रोगाच्या नियंत्रणासाठी साखर कारखान्यांनी माफक दरात ड्रोन उपलब्ध करून द्यावेत.
- खते व कृषी औषधांच्या वाढत्या किमतींवर शासनाने नियंत्रण आणावे.
- शेतात विजेचा करंट लागून मृत्यू झालेल्या शेंडगे व नागणे कुटुंबांना तत्काळ शासकीय मदत द्यावी.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका ऊस दर संघर्ष समितीने घेतली आहे.
“आज शेतकरी आपल्या हक्कासाठी तहसील कार्यालयावर आवाज उठवत आहे. उद्या हा आवाज जिल्हाभर पोहोचेल. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र असेल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
— ऊस दर संघर्ष समिती, पंढरपूर

