मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
*"वाद नको, संवाद पाहिजे; समन्वयातून आरोग्य सेवेचा लाभ पाहिजे" या* सकारात्मक भावनेतून मुंबईतील रुग्णांना पालिका रुग्णालयांतून उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. रुग्ण मित्र विनोद साडविलकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांची त्यांच्या मनपा दालनात सदिच्छा भेट घेऊन प्राथमिक चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये मुंबईतील विविध सामाजिक संस्थांना एकत्रित करून 'रुग्ण मित्र स्नेह संवाद' या उपक्रमाची आखणी करण्यात आली. महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, प्रसुतीगृहे आणि दवाखाने येथील सोयी-सुविधा, कार्यपद्धती, दुर्मिळ आजारांवरील उपचार, अवयवदान तसेच रक्तदान शिबिरांसारख्या प्रबोधनात्मक उपक्रमांवर या वेळी सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान पालिका सभागृह नेते गणेश खणकर यांची अचानक झालेली उपस्थिती या संवादास अधिक बळ देणारी ठरली. कल्याणकारी रुग्ण सेवेसाठी पालिका प्रशासन रुग्ण मित्रांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वास आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी या वेळी दिला.
या प्रसंगी रुग्ण मित्रांच्या वतीने सभागृह नेते गणेश खणकर आणि आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते 'कॅन्सर बरा होऊ शकतो' हे मार्गदर्शक पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
अनेक रुग्ण मित्रांची उपस्थिती
या सदिच्छा बैठकीला रुग्ण मित्र धनंजय पवार, श्रीविद्या सरवणकर, गणेश पवार, रमेश चव्हाण, गोविंद मोरे, विजय कांबळे, जय साटेलकर, शांताराम मोरे, प्रज्वला इंगळे, दिनेश बैरीशेट्टी, गौतम पाईकराव, शिवकुमार गुप्ता, ममता पांडे, कमलेश साळकर, सुरेश पांचाळ, तृप्ती पवार, सुजाता पवार, आराध्य पवार यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि रुग्ण मित्रांचे आभार धनंजय पवार यांनी मानले.

