सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
कलेक्टर होण्यापूर्वी मी सीए होतो. सीए परीक्षेत टॉप रँक मिळवल्यानंतर मला विदेशात मोठी नोकरी मिळाली. दरमहा साडेसहा लाख रुपयांचे पॅकेज होते. या नोकरीत मी समाधानी नव्हतो. हातात सुरक्षित नोकरी असतानाही मी समाधानाच्या शोधात होतो. याच वेळी मला कलेक्टर होण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार मी तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात मी आयएएस उत्तीर्ण झालो. सेवा म्हणून मी जिल्हाधिकारी पदाची नोकरी स्वीकारली. यात मालक न होता लोकसेवक बनल्याने समाधान मिळाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रशासकीय सेवेत मालक होऊ नये. तर लोकसेवक बनावे, असा सल्ला सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी तसेच उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित बौद्धिक बँक व्याख्यानमालेत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी ‘माझे ध्येय, संघर्ष तसेच यश’ या विषयावर मंगळवारी पहिले पुष्प गुंफले. येथील डॉ. फडकुले सभागृहात ही व्याख्यानमाला सुरू असून, यंदा व्याख्यानमालेचे ६१ वे वर्ष आहे.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासकीय सेवेची तयारी करताना तीन बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ही नोकरी सेवा म्हणून स्वीकारा आणि सेवा करण्याची मानसिकता ठेवा. नवीन विषय स्वीकारण्याची आवड जोपासा आणि नवीन विषय आत्मसात करण्याची ताकद अंगी बाळगा. तसेच भाषा शिकण्याची तयारी ठेवा. जोपर्यंत स्थानिक भाषा शिकत नाही, तोपर्यंत संबंधित लोकांच्या अडचणी आणि समस्या समजून घेता येणार नाहीत.

