गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील गादेगावचे सुपुत्र तथा विजय तुकाराम मोरे यांचे चिरंजीव विश्वजीत मोरे यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर अभिमानास्पद यश संपादन केले आहे. एम.टेक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची देशातील नामांकित दुग्धसंस्था अमूल (AMUL) येथे ‘Executive Quality Assurance Officer’ या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे मोरे कुटुंबीयांसह संपूर्ण गादेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विश्वजीत मोरे यांना या पदासाठी वार्षिक १५ लाखांपेक्षा अधिकचे पॅकेज मिळाले आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत, आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर देशातील नामांकित संस्थेत जबाबदारीच्या पदावर पोहोचण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांच्या या यशाने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले असून, कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
नागेश फाटे यांच्या हस्ते सत्कार
विश्वजीत मोरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. नागेश एकनाथ फाटे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी विश्वजीत यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे, मेहनतीचे आणि जिद्दीचे भरभरून कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
यावेळी बोलताना नागेश फाटे यांनी उच्च शिक्षण, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वास यांच्या बळावर युवकांनी उद्योग व विविध क्षेत्रांत मोठी भरारी घ्यावी, असे आवाहन केले. विश्वजीत यांच्या यशातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गादेगावच्या सुपुत्राच्या यशाचा अभिमान
विश्वजीत मोरे यांचे हे यश ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. परिस्थिती कोणतीही असो, मनात जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशामुळे गादेगावातील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सत्कारप्रसंगी अजित मोरे, विजय मोरे, तानाजी बागल, विशाल मोरे, वैभव बागल, शिवाजी बागल, महादेव बागल, बालाजी देशमुख तसेच शिवरत्न पब्लिक स्कूलचे अध्यक्ष श्री. गणपत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विश्वजीत मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करणाऱ्या विश्वजीत मोरे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!


