वाडीकुरोली प्रतिनिधी स्वप्नील जमदाडे तेज न्यूज
वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, वाडीकुरोली येथे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य संजय कुलकर्णी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक कुमार गाजरे लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
क्रीडा नैपुण्याचा गौरव:
गोळा फेक व थाळी फेक या क्रीडा प्रकारात तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु. सुरेखा जाधव हिचा सत्कार प्राचार्य संजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक कुमार गाजरे यांनी केले. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याची थोडक्यात माहिती दिली.
प्रा. स्वप्निल जमदाडे यांनी आपल्या मनोगतात 'कमवा आणि शिका' योजना, सर्वधर्म समभाव आणि भाऊराव पाटलांना 'कर्मवीर' ही पदवी कशी मिळाली याबाबत सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संजय कुलकर्णी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रेरणादायी इतिहास सांगितला व "स्वतः शिका व इतरांनाही शिकवा" हा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सरडे यांनी केले. यावेळी जाधव ,गावडे , जोगी , नवले व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

