ओतूर प्रतिनिधी सुभाष हांडे देशमुख तेज न्यूज
शिक्षक दिनाचे औचित्य साधून जय बजरंग गणेश मंडळ व कवठे यमाई उत्सव मंडळ ओतूर आयोजित, परिसरातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी ओतूर येथील श्री कवठे यमाई मंदिराच्या प्रांगणात उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
गुरुवर्य श्री. प्रतापराव खंडेराव हांडे देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री. बबनराव गणपतराव पानसरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती सुनंदा बबन डुंबरे, उद्योजक श्री. जनार्दन खामकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ओतूर व परिसरातील सुमारे ३०० शिक्षकांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. विठ्ठल भिकाजी शितोळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन केले. त्यांच्या प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापराव हांडे देशमुख यांनी शिक्षक आणि शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “ज्ञान, विद्या आणि शिक्षण देतो तो शिक्षक. विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो तो खरा शिक्षक. समाजाच्या विचारसरणीत व वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणत राष्ट्राच्या विकासाला हातभार लावण्याचे महान कार्य शिक्षक करीत असतो.”
प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च राहिले असून काळ बदलला तरी गुरुचे महत्त्व अबाधित असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे शिक्षक दिनाविषयी बोलताना त्यांनी नमूद केले की, ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि शिक्षणक्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस शिक्षकांना समर्पित करण्यात आला आहे.“डॉ. राधाकृष्णन यांचा शिक्षक ते राष्ट्रपती हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सुशीला बाजीराव डुंबरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष भिवाजी माळवे गुरुजी, बबन फापाळे सर आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून सत्काराने गौरविण्यात आलेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी मुख्याध्यापक विलास नामदेव सुतार यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, नागरिक तसेच कार्यक्रमाचे आयोजक संस्था व मंडळांचे यथोचित आभार मानले.
शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा ओतूर परिसरात संस्मरणीय ठरला.

