पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून या मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांनी तसेच दावे व हरकती असलेल्या नागरिकांनी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच तहसिल कार्यालय निवडणूक शाखेत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता, वय, लिंग, मतदार ओळखपत्र क्रमांक तसेच मतदार केंद्राची माहिती आदी तपशिल तपासणी करावा.
तसेच 01 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह नमुना ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे . मतदार यादीतील चुकीची अथवा मयत,स्थलांतरीत मतदारांची नोंद वगळण्यासाठी नमुना क्र. 07 हा अर्ज करता येईल. तसेच मतदार यादीमधील चुकीच्या नोंदीत नाव, वय, लिंग, नातेसंबंध, पत्ता बदल या दुरुस्तीकरीता नमुना क्र. 08 हा अर्ज करता येईल. नागरिकांना ऑनलाईन सुविधा voters.eci.gov.in याव्दारेही ऑनलाईन अर्ज व आवश्यक कार्यवाही करता येईल.
लोकशाही बळकट करणेसाठी प्रत्येक पात्र नागरिकाने या पुनरिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच पात्र मतदारांनी आपली तसेच आपल्या कुटूंबीयांची नावे मतदार यादीत आहेत किंवा नाही याची तपासणी करून आवश्यक असल्यास दावे व हरकती नोंदवाव्यात असे आवाहनही मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

