पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य सौ. सुनेत्राताई पवार, अमरजीत पाटील, जे. बी. भायगुडे, डॉ. राजेंद्र जाधव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला.
रॅलीमध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शाखेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थिनींच्या झांजपथकाने ढोल-ताशांच्या निनादात उत्साहपूर्ण सादरीकरण केले. तसेच लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदी पारंपरिक युद्धकला व क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या हातातील फलकांवर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची तसेच रयत शिक्षण संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती देण्यात आली होती. ध्वनिक्षेपकावरून कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांचा, त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि उपेक्षित, वंचित व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने केलेल्या कार्याचा जागर करण्यात आला.
शहरातील मान्यवरांकडून कर्मवीरांना अभिवादन
रॅलीदरम्यान पंढरपूर शहरातील विविध मान्यवर, नागरिक, संस्था व माजी विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यामध्ये शंकर खरात, तानाजी खरात, नवनाथ खरात (हॉटेल अहिल्या, पंढरपूर), शिवाजी कोळी, बाळासाहेब वसंतराव नेहतराव, भारत भिंगे (नवी पेठ), पावले किराणा स्टोअर्स (नवी पेठ), नाथ चौक तरुण मंडळ व माजी विद्यार्थी संघ, महादेव आदापुरे (नाथ चौक), मंगेश देशपांडे (नाथ चौक), राजेंद्र निंबाळकर, शिवम ज्वेलर्स (सावरकर चौक), कर्नल भोसले चौक तरुण मंडळ, पंढरपूर, प्रा. सुदाम गायकवाड, रमेश एकनाथ पाटील, सुभाष भोसले (माजी नगराध्यक्ष) आणि जयवंतराव माने यांचा समावेश होता.
या सर्व मान्यवरांनी व संस्थांच्या प्रतिनिधींनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या महान शैक्षणिक कार्यास अभिवादन केले.
फुलांनी आकर्षक सजवलेल्या रथामध्ये ठेवण्यात आलेली कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा हे रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे उत्स्फूर्त स्वागत करून अभिवादन केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले कार्य, शिक्षणासाठी केलेला संघर्ष, ‘कमवा आणि शिका’ या विचारातून विद्यार्थ्यांना दिलेली प्रेरणा आणि समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे त्यांचे ध्येय यांचा प्रचार व प्रसार करणे, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आणि त्यांच्या शैक्षणिक विचारांची नव्या पिढीला ओळख करून देणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश होता.
रॅलीच्या यशस्वी आयोजनामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ व पिण्याचे पाणी वितरित करण्यात आले. पंढरपूर नगरपालिका तसेच पंढरपूर शहर पोलीस प्रशासनाने रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, नागरिक आणि कर्मवीरांच्या कार्याशी आत्मीयता असलेले विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. कर्मवीरांच्या विचारांचा जागर, त्यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मरण आणि रयत शिक्षण संस्थेच्या समाजविकासातील योगदानाची जाणीव करून देणारी ही रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

