जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर तेज न्यूज
गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा मनपा केअर रुग्णालयातील डॉक्टर व अन्य रिक्त पदांचा दुष्काळ लवकरच संपणार आहे.महिन्याभरात डॉक्टर व अन्य रिक्त पदांमुळे रूग्णालयात निर्माण झालेल्या गैरसोई दूर करण्यासाठी कूपर आणि ट्रॉमा रुग्णालयात लवकरच ७९० अतिरिक्त पदांची मेगाभारती करण्यात येणार असल्याचे आश्वासन आरोग्य खात्यांचे उपायुक्त शरद उघडे यांनी खासदार रविंद्र वायकर याना बैठकीत दिले.
या बैठकीत काही नवीन सेवा सुरु करण्याबरोबरच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.२७-मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील तसेच कूपर रुग्णालयाशी निगडीत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी खासदार रवींद्र दत्ताराम वायकर यांच्या अध्यक्षतेखाली जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालयात मंगळवारी विशेष बैठक पार पडली.
या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद उघडे यांच्यासह पालिकेच्या आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी, रुग्णालयाचे प्रशासन आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.२०१३ पासून आरोग्य खात्याने रुग्णालयातील पद भरतीचा आकृतिबंध तयार केला नव्हता.त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात डॉक्टरांबरोबरच अनेक पदे रिक्त होतीयाचा ताण रुग्णालयाच्या सेवा सुविधेवर पडत होता.ही अडचण दूर करण्यासाठी आरोग्य खात्याने आकृतिबंध तयार केला असून कूपर आणि ट्रॉमामधील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ७९० पदांची अतिरिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांना माफत दरात जनरिक औषधे उपलब्ध करण्यासाठी ट्रॉमा तसेच कुपर रुग्णालयात नागरिकांसाठी लवकरच 'जनरिक मेडिसिन' सुविधा सुरू करावी अशी मागणी खासदार वायकर यांनी केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत केली होती.त्यानुसार मनपाच्या विविध रुग्णालयात मिळून ५० ठिकाणी जेनेरिक मेडिसिन सुविधा सुरु करण्यात येणार असून यात कुपर रुग्णालयातील याचे काम पूर्ण झाले असून ट्रॉमा रुग्णालयासाठी ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव येथील गोरगरीब रुग्णांसाठी महत्वपूर्ण असलेल्या ट्रॉमा रुग्णालयात फिजिओथेरपी सुविधा नसल्याने ही सेवा तात्काळ सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.ही सेवा देखील लवकरच सुरू करण्याचे आश्वासनही प्रशासनातर्फे देण्यात आले.लहान मुलांवर आता कूपर रुग्णालयासोबतच ट्रॉमा रुग्णालयातही शस्त्रक्रिया करण्यात येतील.तसेच ट्रॉमा रुग्णालयात नवजात शिशु तीव्र काळजी विभाग (NICU) सुरू करण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उपायुक्त शरद उघडे यांनी दिली.
सद्यस्थिती एवढ्या मोठ्या ट्रॉमा रुग्णांत फक्त १० आयसीयू बेड आहेत.ही संख्या तुटपुंजी असल्याने येथील आयसीयू बेडची संख्या १०० करण्यात यावी,अशी स्पष्ट सूचना खासदार रवींद्र वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.याबाबतही लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,असे अश्वसान देण्यात आले.
ओशिवरा येथिल १५० खाटांचे प्रसूतिगृहाचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार असून स्कॉट्सकॉलोनी येथील प्रसुतीगृहाच्या आराखड्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच याची निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त उघडे यांनी दिली.कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ३८ वरून ४३ वर्षे करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.
मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि ट्रॉमा रुग्णालयातील जी कामे कंत्राटपद्धतीने देण्यात आली आहेत अशा ज्या कंत्राटदार एजन्सींनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे जमा केलेले नाहीत, अशा कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकावे तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी सूचना खासदार यांनी बैठकीत केली.रुग्णालयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आणि रुग्णांना दर्जात्मक सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी ११ सदस्यांची विशेष समिती गठीत करावी अशी सूचना खासदार यांनी रुग्णालय प्रशासन यांनी केली.
बचत गटांना रुग्णालयातील कॅन्टीन चालवायला द्यावे,आवश्यक त्या सर्व महत्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही लावण्यात यावे,रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णांची माहिती देणारे बोर्ड लावण्यात यावे.कुपर रुग्णालयात दरदिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुंबईसह महाराष्ट्रच्या विविध कानाकोपऱ्यातून येत असतात. त्यांच्या सुविधेसाठी कुपर रुग्णालयाजवळ सुविधा शौचालय उभारण्यात यावे अशी सूचना खासदार वायकर यांनी केली.रुग्णालय प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास खासदार निधीतून शौचालय उभारण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
या बैठकीस संचालक डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्षीरसागर यांच्यासह रचना सावंत,राजुल पटेल,विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत,अल्ताफ पेवेकर, राजू पेडणेकर, वैभव भराडकर, प्रियांका आंबोळकर,डॉ.आरिफ, स्वप्नील निरभवणे,राजन राणे, बालकृष्ण जोशी,निखिल शिंदे, बाबू धामापूरकर,मनीष नायर, मनोज सातारकर,सुचिता टक्के, स्वप्नील सुर्वे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
