पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
धनगर समाजाच्या विविध हक्कांच्या मागण्यांसाठी सोमवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे समस्त धनगर समाजाच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कनेक्टिंग लिंकचे नामकरण करावे, तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी माऊली हळनवर, विष्णू सुळे संजय माने, द्रोणाचार्य हाके, सोमनाथ ढोणे, राजूबापू गावडे, प्रशांत घोडके, विश्रांती भूषणर, बालाजी पाटील, संतोष शेळके, महेश येडगे, विष्णू सुळे, मल्हारी बनसोडे, संतोष बंडगर, दत्ता कोळेकर, यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यात आहे. ८ सप्टेंबरपूर्वी राज्य सरकारने कोणतीही संदिग्ध भूमिका न घेता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने ठाम व कायदेशीर भूमिका मांडावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच निकाल प्रतिकूल ठरल्यास आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी प्लॅन-बी तयार ठेवावा आणि केंद्र-राज्य शासनाने समन्वयाने निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने संबंधित कनेक्टिंग लिंकचे नामकरण करून अधिकृत अधिसूचना काढावी. चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी तातडीने पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी, तसेच देवस्थानचे स्पेशल अथवा फॉरेन्सिक ऑडिट करावे आणि पारदर्शक कारभारासाठी स्वतंत्र देवस्थान कायदा करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कनेक्टिंग लिंकचे नामकरण करावे, तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे,
श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी तातडीने पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी.

