पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधनविषयक ज्ञानात भर पडावी या उद्देशाने शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी “संशोधन लेख लेखन व प्रकाशन : टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन” या विषयावर ऑनलाइन अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी डॉ. डी. एस. मराठे, विभागप्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग, जे.ई.एस. ए. सी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, खारघर, नवी मुंबई हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन लेख लेखनाची संकल्पना, योग्य संशोधन विषयाची निवड, संशोधन लेखाची रचना, योग्य नियतकालिकाची निवड, हस्तलिखिताची तयारी, लेख सादरीकरणाची प्रक्रिया तसेच संशोधन लेख प्रकाशित करण्याची संपूर्ण प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. मराठे यांनी संशोधन करताना दर्जेदार संदर्भांचा वापर, योग्य व गुणवत्तापूर्ण संशोधन नियतकालिकाची निवड, संशोधनातील नावीन्य, प्रभावी संशोधन लेखन तसेच प्रकाशन प्रक्रियेत घ्यावयाची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी संशोधन लेखन व प्रकाशनाचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
याबद्दल माहिती देताना कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले की, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्यामध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या तज्ज्ञ मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. संशोधन लेख लेखन व प्रकाशनाचे ज्ञान विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक तसेच व्यावसायिक वाटचालीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.
या ऑनलाइन व्याख्यानास इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना संशोधन लेख लेखन, नियतकालिकाची निवड आणि प्रकाशन प्रक्रियेबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याने कार्यक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी,प्रा.अविनाश हराळे, प्रा. वैभव गोडसे तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

