पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यात सध्या पावसानं दडी मारली आहे. पावसाळा सुरु होऊन साधारणत तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. तरीदेखील चांगला पाऊस झाला नसल्यानं शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. खरीपाची पिकं करपू लागली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.. अशातच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट आणखी वाढू शकते. सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीच्या कमी असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीच्या कमी
जुलै महिन्यात काही भागात चांगला पाऊस झाला त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात सरासरी गाठली आहे. मात्र, मराठवाड्यात आणि विदर्भात पाऊस झालेला नाही. अशात, पावसाची तूट ही कदाचित वाढू शकते. सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीच्या कमी आहे. सप्टेंबर महिन्यात विदर्भात काही भागात पाऊस होऊ शकेल, मात्र राज्यात इतर ठिकाणी मात्र पावसाची तूट वाढताना दिसेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात मोठा पाऊस नसेल, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल अशी माहिती मुंबईच्या हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
खरीप पिकांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता
दरम्यान, राज्यात पावसाने पुन्हा उघडीप दिली असून, मॉन्सूनचे प्रवाह कमकुवत झाल्यामुळे पुढील काही दिवस पावसाची स्थिती फारशी बदलण्याची शक्यता नाही. काही भागांत ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, मात्र त्या सर्वदूर नसतील. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरीप पिकांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहे.त कधी पाऊस पडणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

.jpg)