पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या वतीने दि.२३ ऑगस्ट २०२६ रोजी ‘ईलाइट स्टुडंट क्लब २०२६-२७’ चे उदघाटन तसेच ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ‘एक्सप्लोर, एनोव्हेट, इन्स्पायर’ या संकल्पनेवर आधारित ईलाइट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता, नेतृत्वगुण, संघभावना आणि नाविन्यपूर्ण विचार विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती, भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ भारतरत्न स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
‘राष्ट्रीय अंतराळ दिना’निमित्त विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा आणि अंतराळविषयक व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपली सर्जनशीलता, तांत्रिक ज्ञान आणि अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दलची आवड प्रदर्शित केली. यावेळी पी.ई.एल रोबोटिक्स उरण, मुंबईचे प्रणित भोईर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच भारताची अंतराळ क्षेत्रातील प्रगती, अंतराळ तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या कल्पना व अनुभव मान्यवरांसमोर मांडले. या संवादामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण विचार करण्यासाठी प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमास इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ईलाइट क्लब चे उदघाटन आणि राष्ट्रीय अंतराळ दिनाचा कार्यक्रम ज्ञानवर्धक, सर्जनशील आणि संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी संस्थेची बांधिलकी अधोरेखित झाली.
या कार्यक्रमासाठी पी.ई.एल रोबोटिक्सचे प्रमुख एस.म्हसकर तसेच स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती, विभागप्रमुख डॉ.एन. ए. तळवलकर, सहविभागप्रमुख प्रा. एम. बिश्वास, श्री.सी.पाटील, ईलाइट स्टुडंट क्लबच्या प्रमुख प्रा.प्राजक्ता तुपारे तसेच ईलाइट स्टुडंट क्लबचे सर्व समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ईलाइट क्लब मधील विद्यार्थी समिती सदस्य आदींनी काम पाहिले. सूत्रसंचालन ट्विंकल कदम आणि अंकिता बशेट्टी यांनी केले तर विभागप्रमुख डॉ.एन. ए. तळवलकर यांनी आभार मानले.

