मुंबई परेल विशेष प्रतिनिधी महेश्वर भिकाजी तेटांबे
"भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जात-धर्म विसरून एकत्र येणे हीच काळाची गरज आहे," असा संदेश देत, भारतीय स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ'च्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओचे संचालक रामजी दादा डोडीया, लक्ष्मी डोडीया, काफिल अन्सारी, रुची पाटील, सचिन परब, अँड.विजय सातपुते आणि डॉ. मंगेश पेडामकर यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात केक कापून आणि तिरंग्याला वंदन करून झाली. उपस्थितांनी देशासाठी बलिदान दिलेल्या अमर हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून भावपूर्ण मानवंदना अर्पण केली.
या सोहळ्यात स्टुडिओमधील गायक आणि गायिकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांची मैफल सजवली. या गीतांनी वातावरणात देशप्रेमाचा संचार केला आणि उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनात देशाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. या विशेष प्रसंगी गायक-गायिकांसह अनेक मान्यवर अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आवर्जून उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवामागील मुख्य उद्देश स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की, "आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्या हुतात्म्यांचे स्मरण करून, प्रत्येक भारतीयामध्ये राष्ट्रप्रेम जागृत ठेवणे आणि भारतमातेच्या ऋणात राहून तिची सेवा करणे, हाच आमचा मूळ हेतू आहे." देशभक्तीच्या या चैतन्यमय वातावरणात आणि कलाकारांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.

