जोगेश्वरी प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जाणिवांचा समतोल साधत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय, जोगेश्वरी येथे विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गेल्या पंधरा वर्षांपासून विद्यालयात हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून विद्यार्थ्यांना कार्यशिक्षणातून कला, कौशल्य आणि पर्यावरण संवर्धनाची प्रत्यक्ष अनुभूती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवीन शैक्षणिक आराखड्यातील कार्यशिक्षण, विविध कला व हस्तकौशल्य यांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंतर्भाव करण्यात आला आहे. याच शैक्षणिक दृष्टिकोनाला कृतीची जोड देत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘शिकणे म्हणजे केवळ पाहणे किंवा ऐकणे नव्हे, तर स्वतः कृती करून अनुभव घेणे’, या विचाराचा प्रत्यय विद्यार्थ्यांना या उपक्रमातून आला.
कार्यशाळेच्या मार्गदर्शिका श्रीमती संगीता शंकर सातपुते यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले. मूर्तीचा आकार देणे, तिचे बारकावे घडविणे, मूर्ती योग्य प्रकारे सुकविणे तसेच नैसर्गिक पद्धतीने रंगकाम करणे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विविध कार्यशाळांमध्ये प्रशिक्षण देण्याचा तसेच विविध वृत्तपत्र समूहांनी आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याचा त्यांना अनुभव आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, तसेच शाडूच्या मातीच्या मूर्तींचे पर्यावरणीय महत्त्व याबाबत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रचना पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘परंपरा जपत पर्यावरणाची काळजी घेणे हीच खरी जबाबदारी’ हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला.
कार्यक्रमाची सुरुवात कुमारी देविका बारड हिच्या अथर्वशीर्ष गायनाने झाली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी तिला साथ दिल्याने वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका श्रीमती विजया पाटील व श्रीमती सोनाली गीते उपस्थित होत्या. संस्थेच्या सेवाव्रती कार्यकर्त्यांनीही उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
कार्यशाळेस संस्थेचे सन्माननीय कार्याध्यक्ष श्री. चंद्रशेखर पारखी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचे कौतुक केले. तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. संतोष फडतरे आणि पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख श्रीमती क्षमा मोंडकर यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य, कल्पनाशक्तीला दिशा आणि पर्यावरण संवर्धनाला कृतीची जोड देणारा हा उपक्रम म्हणजे कार्यशिक्षणाचा आदर्श नमुना ठरला. शाडूच्या मातीची मूर्ती तयार करताना विद्यार्थ्यांनी केवळ एक कलाकृती घडवली नाही, तर ‘माझा उत्सव, माझी जबाबदारी आणि माझे पर्यावरण’ ही जाणीवही मनात रुजवली.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवाव्रती कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका श्रीमती रचना पवार यांनी आभार मानले.

