पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटरबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ग्राहकांचे प्रबोधन करुन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात येईल असे आश्वासन महावितरण पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर साळवे यांनी ग्राहक तक्रार निवारण दिनामध्ये दिले.
महावितरणतर्फे प्रत्येक महिन्यात तिसऱ्या बुधवारी विभागीय कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येतो. यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातीलअनेक मुद्दे उपस्थित केले.मीटर जलद गतीने पळते,अवाजवी बील येते,एकदा मीटर बसविले की पुन्हा कोणत्याही प्रकारची तक्रार करता येत नाही,इ.शंका,समज- गैरसमज असल्याने ग्राहक स्मार्ट मीटर बसविण्यात ग्राहकांचा विरोध होत असल्याचे ग्राहक पंचायतीने निदर्शनास आणून दिले.त्यावर चर्चा होऊन ग्राहकाच्या मागणी नुसार स्मार्ट मीटरसोबत जुने मीटर बसवून रिडींगची पडताळणी करता येईल,ग्राहकांना दोन तीन कंपन्यांचे मीटर उपलब्ध करून देण्यात येतील,त्यामधून मीटरची निवड केली करता येईल,मीटरचा टेस्ट रिपोर्ट देण्यात येईल,तसेच मीटर बसविण्यासाठी येणाऱ्या ठेकेदाराच्या प्रतिनिधिजवळ ओळखपत्र देण्यात येईल,त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचा नाव,मोबाईल नंबर देण्यात येईल असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
सरासरी बील येणे,ऊस जळीत प्रकरणी कार्यवाहीस विलंब,अवाजवी बीलाची दुरुस्ती अशा स्वरूपातील तक्रारींचे ग्राहक समक्ष उपस्थित होते. ग्राहकांच्या तक्रारी तातडीने, प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही कार्यकारी अभियंता साळवे यांनी सांगितले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा मध्यस्थता कक्षाचे सदस्य संभाजी लंगोटे,जिल्हा सदस्य पांडुरंग अल्लापूरकर,तालुका कार्यकारिणी सदस्य अंकुश वाघमारे,मंगेश देशपांडे,सागर कोळेकर, ग्राहक वैभव कुलकर्णी,मोहन हुंगे ,दिलीप माळी,शिवाजी अलकट प्रशांत माळवदे तसेच महावितरणचे पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर साळवे,पंढरपूर शहरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय शिंदे,विभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब मोटे, तसेच उपव्यवस्थापक महसूल सुरवसे,आनंद गायकवाड व ग्राहक उपस्थित होते.

