माढा प्रतिनिधी प्रतिनिधी तेज न्यूज
माढा तालुक्यातील चांदज गावच्या युवा मल्लाने आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात दमदार कामगिरी करत माढा, सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत हनुमंत राजेंद्र जाधव याने भारताचे प्रतिनिधित्व करत ४५ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
हनुमंतच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे चांदजसह संपूर्ण माढा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील या युवा मल्लाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची ताकद सिद्ध केली आहे.
विशेष म्हणजे, अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत हनुमंतने कुस्तीची जिद्द कायम ठेवली. त्याचे आई-वडील रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही हनुमंतने सराव, मेहनत आणि जिद्द सोडली नाही.हनुमंतच्या कुस्तीच्या प्रवासाला त्याच्या आजोबांनीही मोठी प्रेरणा दिली. आजोबांना कुस्तीची विशेष आवड असल्याने त्यांनी लहानपणापासूनच हनुमंतला मातीच्या या पारंपरिक खेळाशी जोडले. त्याच्यामध्ये पैलवान होण्याचे स्वप्न रुजवले आणि त्या स्वप्नाला हनुमंतने आपल्या मेहनतीच्या जोरावर जागतिक व्यासपीठावर नेले.
रोजंदारी करणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा आज भारतासाठी जागतिक पदक जिंकतोय, हीच हनुमंतच्या संघर्षाची, जिद्दीची आणि यशाची खरी कहाणी आहे. त्याच्या या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील अनेक होतकरू खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.

