मुंबई/नवी दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील सर्व आठ खासदार आज, सोमवार (१० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत अधिकृत भेट घेणार आहेत. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या भेटीची माहिती दिली असून, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या बैठकीत खासदार आपल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच नागरिकांच्या विविध मागण्या पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मांडणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती, दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यावरही पंतप्रधानांशी चर्चा होण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केल्यानुसार, ही भेट कोणत्याही राजकीय युतीच्या पार्श्वभूमीवर नसून, खासदारांनी संसदीय कार्यालयामार्फत पंतप्रधानांकडे अधिकृत वेळ मागून घेतलेली आहे. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढण्यापेक्षा मतदारसंघातील आणि राज्यातील प्रश्न मांडण्यासाठी ही भेट असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
हे आठ खासदार मोदींची भेट घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी शरद पवार गटाचे लोकसभेतील आठही खासदार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे (बारामती), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), निलेश लंके (अहमदनगर), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा), सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा (भिवंडी), अमर काळे (वर्धा), भास्कर भगरे (दिंडोरी) आणि बजरंग सोनवणे (बीड) यांचा समावेश आहे.
डिलिमिटेशनच्या पार्श्वभूमीवर भेटीला राजकीय महत्त्व
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असताना ही भेट होत आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या (Delimitation) संभाव्य विधेयकाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
आमदार रोहित पवार यांनीही स्पष्ट केले आहे की, पंतप्रधानांसोबत मतदारसंघ आणि विकासकामांबाबत चर्चा होत असली तरी शरद पवार गटाचे खासदार डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधातच मतदान करतील. त्यामुळे एका बाजूला पंतप्रधान मोदींसोबत बैठक आणि दुसऱ्या बाजूला संभाव्य डिलिमिटेशन विधेयकाला विरोध, या दोन्ही घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला नवा विषय मिळाला आहे.
विकासकामांसाठी पंतप्रधानांची भेट की राजकीय संदेश?
शरद पवार गटाकडून ही भेट विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी असल्याचे स्पष्ट केले जात असले, तरी सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

