सांगली प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील एक पत्रकार (वैद्यकीय कारणासाठी गाव आणि नाव येथे देत नाही) आपल्या पत्नीवरील उपचारासाठी सांगलीत आले आहेत. त्यांच्या पत्नीसाठी मोठ्या प्रमाणावर प्लाजमाची आवश्यकता होती. पंधरा ते वीस लोकांनी एका वेळी येऊन रक्तदान केल्याशिवाय उपचाराची गरज पूर्ण होणार नव्हती. अशावेळी परगावात एक पत्रकार काय करणार ?
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण शिंदे यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानुसार सांगलीतील सात ते आठ पत्रकारांनी जाऊन तात्काळ रक्तदान केले.
ही माहिती रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सागर सदाभाऊ खोत यांना समजताच त्यांनीही तातडीने आपल्या टीम मधील सात-आठ युवकांना पाठवून देऊन रक्तदान केले.
त्यामुळे परगावाहून सांगलीत उपचारासाठी आलेल्या एका पत्रकाराला तातडीने मदत पोहोचू शकली. आपण पत्रकारच एकमेकांच्या मदतीला उभे राहिलो तर प्रत्येकाचे दुःख हलके होऊ शकते. या कार्यात झटलेल्या प्रवीण शिंदे आणि रक्तदात्या सर्व पत्रकारांचे कौतुक तर आहेच.
पण पत्रकारांच्या हाकेला ओ देऊन मदतीला उभे राहिलेल्या सागर खोत यांचेही आभार आणि अभिनंदन. त्यानी आपल्यातील सजग माणूस असाच कायम सक्रिय ठेवावा. त्यांच्या उज्वल कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
याविषयी माहिती शिवराज काटकर अध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई. चंद्रकांत क्षीरसागर, सांगली [ कोल्हापूर विभागीय सचिव ]अ. भा. मराठी पत्रकार परिषद यांनी तेज न्यूजच्या प्रतिनिधी ला दिली.

